‘स्थायी’च्या सभापतिपदी संदीप नेजदार

By admin | Published: February 1, 2017 01:14 AM2017-02-01T01:14:10+5:302017-02-01T01:14:10+5:30

महापालिकेचे राजकारण : फोडाफोडीस आघाडीचे चोख उत्तर; शिवसेनेने दाखविली भाजपला औकात; घोडेबाजाराचा आरोप

Sandeep Nejdar becomes the Chairman of 'Standing' | ‘स्थायी’च्या सभापतिपदी संदीप नेजदार

‘स्थायी’च्या सभापतिपदी संदीप नेजदार

Next

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने त्यांची औकात दाखविल्यामुळे मंगळवारी महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे संदीप नेजदार विजयी झाले. नेजदार यांनी भाजपच्या आशिष ढवळे यांच्यावर अत्यंत चुरशीच्या लढतीत ८ विरुद्ध ७ मतांनी विजय मिळविला. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला. सौदेबाजी, सदस्याची पळवापळवी आणि राजकीय ईर्ष्येला लाभलेली संघर्षाची धार यामुळे अभूतपूर्व तणाव तसेच पोलिस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडली.
स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस सदस्य रिना कांबळे यांचे अचानक गायब होणे, त्यांनतर काँग्रेसकडून नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर दबाव आणण्यामुळे निवडणुकीला कमालीच्या तणावाची झालर लागली. चार दिवसांत ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता निवडणूक मात्र शांततेत पार पडली. गेल्या सव्वा वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस व भाजपपासून तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने यावेळी मात्र सभापतिपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या संदीप नेजदार यांच्या पारड्यात मत टाकून भाजपला त्यांची औकात दाखविली. त्यामुळे संदीप नेजदार यांना ८, तर भाजपच्या आशिष ढवळे यांना ७ मते मिळाली. एका मताने ढवळे यांचा पराभव केला.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींत भाजपने काँग्रेसच्या नगरसेविका रिना कांबळे यांना आपल्या बाजूला खेचण्याची चाल यशस्वी केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी गोटात अस्वस्थता पसरली होती. त्याचा राग म्हणून ताराराणी आघाडीच्या नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द करा, म्हणून काँग्रेसने प्रतिष्ठेचा विषय केला; परंतु नीलेश देसाई यांच्यावरील कारवाईला मिळालेली स्थगिती उठविल्याचा जोपर्यंत स्पष्ट अहवाल येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई करणार नाही, असे आयुक्त शिवशंकर यांनी ठामपणे सांगितले.
शह-काटशहाच्या राजकारणामुळे निवडणुकीत कमालीची चुरस आणि तणाव निर्माण झाला होता; परंतु जेवढी चुरस निवडणुकीपूर्वी होती, ती मतदानापर्यंत राहिली नाही. निवडणुकीनंतर मात्र दोन्ही गटांनी एकमेकांवर घोडेबाजाराचा आरोप केला.


काँग्रेसचा शिवसेनेशी सौदा - भाजप आघाडी

गेले सव्वा वर्षे तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेबरोबर काँग्रेसने सौदेबाजी करून स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक जिंकली, असा आरोप भाजप-ताराराणी आघाडीतर्फे विजय सूर्यवंशी, सुनील कदम व सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. रिना कांबळे यांच्या अचानक गायब होण्याशी आमच्या आघाडीचा काही संबंध नाही, त्या जर आमच्याकडे आल्या असत्या तर मग मतदानासाठी घेऊन आलो असतो, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेने काँग्रेसला मतदान करून आपला खरा चेहरा उघड करून दाखविला. महापालिकेतील जागा हडप करण्याचे प्रकार, आयआरबीचे रस्ते गैरव्यवहार, एसटीपी आणि थेट पाईपलाईन योजनेमधील भ्रष्टाचारावर सेनेने आरोप केले होते; परंतु आज मात्र त्यांनाच मतदान करून या भ्रष्टाचारात आपणही सहभागी असल्याचे दाखवून दिले. काँग्रेस व शिवसेनेत सौदेबाजी झाली आहे म्हणूनच प्रतिज्ञा निल्ले यांनी कॉँग्रेसला मतदान केले, असे कदम यांनी सांगितले. कॉँग्रेसने केला शिवसेनेशी सौदा : ताराराणी आघाडी रिना कांबळे या आमच्या आघाडीकडे आलेल्या नाहीत. त्या गगनबावडा येथील साखर कारखान्यावर आहेत. त्या भाजपच्या उमेदवारास मतदान करतील या भीतीने कॉँग्रेसनेच त्यांना बंदीवान केले, असा आरोप सत्यजित कदम यांनी केला. शिवसेनेचे चार सदस्य प्रत्येक निवडणुकीत कॉँग्रेसच्या आश्रयाखाली राहिले आहेत. आज तर त्यांनी उघड भूमिका घेतली. महापालिकेतील भ्रष्टचारात त्यांचाही हात असल्याचे स्पष्ट झाले, असे कदम यांनी सांगितले.


सतेज यांनी केली ‘सर्जरी’
आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक व कसबा बावड्यातील नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांची स्थायी सभापतिपदी निवड झाल्यानंतर ‘सतेज यांनी आणखी एक राजकीय सर्जरी’ केल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त झाली. नेजदार यांचा पराभव व्हावा यासाठी महाडिक गटाने जंग-जंग पछाडले होते; परंतु त्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन चमत्कार घडवून आणला व ही लढत जिंकली. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाराणा प्रताप चौकातील हॉस्पिटल उद्घाटन समारंभात ‘सतेज पाटील हे राजकीय सर्जन’ असल्याचे म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर या निवडीनंतर पुन्हा आल्याचे मेसेजेस त्यांच्या समर्थकांकडून दुपारनंतर फिरत होते.


रिना कांबळेंचं काय झालं ?
सभापती कोण होणार यापेक्षा पक्षादेश धुडकावून चार दिवस गायब असलेल्या रिना कांबळे या सभागृहात येणार का? या औत्सुक्याच्या विषयावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पडदा पडला. त्या सभागृहाकडे फिरकल्याच नाहीत. कांबळे यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या कारखान्याच्या विश्रामगृहावर ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला, तर कांबळे आपल्या विरोधात मतदान करतील या भीतीने काँग्रेसनेच गगनबावडा येथील आमदार सतेज पाटील यांच्या कारखान्यावर लपवून ठेवल्याचा आरोप ‘ताराराणी’चे गटनेते सत्यजित कदम यांनी केला. त्यामुळे रिना कांबळे यांचे नेमके काय झाले ? त्या गेल्या कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पक्षप्रमुखांना अहवाल देणार : क्षीरसागर
शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांचे मत निर्णायक ठरले. मागच्या काही निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली; परंतु यावेळी निल्ले यांनी काँग्रेसला थेट मतदान केले. याबाबत खुलासा करताना संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या आदेशावरून काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज यांनी सांगितले. त्यात कोणताही सौदा झालेला नाही. शिवसेना स्वाभिमानी असून आम्ही भाजपला पाणी पाजले, त्यांची औकात दाखविली, असेही लिंग्रज म्हणाले; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याही निवडणुकीत तटस्थ राहावे, असा आदेश मला दिला होता, तो मी निल्ले यांना सांगितला. मात्र, त्यांनी तो ऐकला नाही. याबाबत दोन दिवसांत मी अहवाल देणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.


महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. त्याची सुरुवात आज झाली असती; पण दुर्दैवाने शिवसेनेने काँग्रेसला मदत केली. काँग्रेसचा घोडेबाजार यशस्वी झाला, असे विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेता किरण शिराळे, आशिष ढवळे उपस्थित होते.

Web Title: Sandeep Nejdar becomes the Chairman of 'Standing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.