Kolhapur: आयटी इंजिनिअरचा ट्रेडिंगच्या नावे गंडा, दहावी पास सलून व्यावसायिक कंपनीचा सीईओ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:42 AM2024-10-11T11:42:18+5:302024-10-11T11:42:40+5:30
एजंटचे धाबे दणाणले
कोल्हापूर : शेअर बाजारात ट्रेडिंग करून दहा महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना दीड कोटींचा गंडा घालणारा संदीप पाटील (रा. आमशी, ता. करवीर) हा आयटी इंजिनिअर आहे. गावातील दहावी पास असलेला सलून व्यावसायिक सागर खुटावळे याला त्याने कंपनीचा सीईओ बनविले, तर गावातील विकास कांबळे या उच्चशिक्षिताला त्याने अकाउंटंट बनविले. हे तिघेही अटक टाळण्यासाठी मोबाइल बंद ठेवून पसार झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
आमशी येथील संदीप पाटील याने गावात आणि कोपार्डे येथे १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातून त्याने आयटी इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. २००६ पासून तो पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी करीत होता. कोरोनाकाळात गावाकडे आल्यावर त्याने ट्रेडिंग सुरू केले. यातून चांगला पैसा मिळत असल्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांना पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने २०२२ मध्ये कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये दोन हजार लोकांना जेवण दिले. त्यानंतर त्याने राजारामपुरीत कंपनीचे कार्यालय सुरू केले. गावातील मित्र आणि काही पै-पाहुण्यांना सोबत घेऊन त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो साथीदारांसह पसार झाला असून, पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर आहे.
डिसेंबर २०२३ पासून परतावे बंद
सुरुवातीला कंपनीने दरमहा १० टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. डिसेंबर २०२३ पासून परतावे थांबले. कंपनीच्या खात्यावर २०० कोटी रुपये असून, सेबीच्या निर्बंधामुळे ते काढता येत नसल्याचे तो गुंतवणूकदारांना व्हॉट्सॲप ग्रुपवरून सांगत आहे. चार दिवसांपूर्वी त्याने एक मेसेज पाठवून अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे गुंतवणूकदारांना आवाहन केले.
एजंट परागंदा झाले
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच कंपनीच्या एजंटचे धाबे दाणाणले आहेत. करवीर, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात सुमारे १०० एजंट आहेत. यातील अनेकांना कंपनीकडून दुचाकी मिळाल्या आहेत. चौकशीच्या फेऱ्यात अडकू नये, यासाठी एजंट परागंदा झाले आहेत. तसेच कंपनीकडून मिळालेल्या दुचाकी त्यांनी पै-पैहुण्यांकडे पाठविल्याची चर्चा सुरू आहे.