kolhapur: संध्यादेवी, नंदाताईंच्या भूमिकेची चंदगड मतदारसंघात उत्सुकता, शरद पवारांच्या की अजितदादांच्या पाठीशी राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:32 PM2023-07-12T14:32:14+5:302023-07-12T14:54:32+5:30
चंदगडसह कागलच्या राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्यता
राम मगदूम
गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर ह्या राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या की अजितदादांच्या पाठीशी उभ्या राहणार याचीच उत्सुकता गडहिंग्लज विभागासह कोल्हापूर जिल्ह्याला लागली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे चंदगडसह कागलच्या राजकारणालाही कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच कुपेकरप्रेमींसह जनतेलाही त्यांच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे.
शरद पवार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कुपेकरांच्या पश्चातही दोन्ही घराण्यांनी हा ऋणानुबंध जिवापाड जपला आहे.परंतु, पवारांच्या घराण्यातच दोन मतप्रवाह तयार झाल्यामुळे कुणाबरोबर जायचे ? हाच प्रश्न ‘संध्यादेवी’ व ‘नंदाताईं’च्यासमोर उभा ठाकला आहे. परंतु, स्व. कुपेकरांची वाटचाल व शिकवण लक्षात घेता त्यादेखील शरद पवारांच्या मागेच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पवार व कुपेकर हे विद्यार्थीदशेपासून एकत्र होते. विद्यार्थी संघटनेपासून राष्ट्रवादीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी एकमेकांना मनापासून साथ दिली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांच्यामागे उभे राहणारे कुपेकर हे राज्यातील काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. म्हणूनच कुपेकरांच्या पश्चात चंदगड मतदारसंघाची धुरा त्यांनी संध्यादेवींच्यावर सोपवली होती. परंतु, संध्यादेवींनी तब्येतीच्या कारणावरून निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखवल्यामुळेच त्यांनी राजेश पाटील यांना उमेदवारी देवून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी संध्यादेवींच्यावर टाकली होती. आमदार राजेश पाटील आता अजितदादांच्या गटात सामील झाल्यामुळे कुपेकरांच्या भूमिकेला महत्व आले आहे.
पुन्हा सक्रिय
- प्रकृतीमुळे संध्यादेवी लढणार नसतील तर नंदाताईंनी लढावे अशी सूचना खुद्द शरद पवारांनी गेल्यावेळी केली होती. परंतु, नंदाताईंनीही नकार दिल्यामुळे कुपेकरप्रेमी नाराज झाले होते..
- गेल्यावेळी नंदाताईंनी भाजपाकडून लढावे, असे प्रयत्न सुरू होते. ‘भाजपातर्फे लढला तर आम्ही तुमच्यासोबत नाही’, अशी भूमिका अमर चव्हाण व सहकाऱ्यांनी घेतली होती. त्यांनीच आता शरद पवारांच्यामागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- आगामी निवडणुकीसाठी शरद पवार गटातर्फे प्राधान्याने नंदाताईंना, त्यांनी नकार दिल्यास अप्पी पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते. त्यामुळे गेल्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलेल्या संध्यादेवी व नंदाताई यानिमित्ताने पुन्हा सक्रिय झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.