श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवींच्या भेटीचा संगम : कोहळ्यासाठी भाविकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:46 AM2018-10-14T00:46:39+5:302018-10-14T00:47:12+5:30

‘अंबामाता की जय’चा गजर, पारंपरिक बॅँड, बेंजोपथक, फुलांच्या पायघड्या, बंदुकीच्या फैरींची सलामी, श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची भेट, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, कोहळा छेदन विधीने शनिवारी त्र्यंबोली यात्रा झाली.

Sangbam meeting of Shri Ambabai-Trimboli Devi: a flock of devotees for Goddess; Polite lathamar | श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवींच्या भेटीचा संगम : कोहळ्यासाठी भाविकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीमार

श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवींच्या भेटीचा संगम : कोहळ्यासाठी भाविकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीमार

Next
ठळक मुद्दे ‘अंबामाता की जय’चा गजर

कोल्हापूर : ‘अंबामाता की जय’चा गजर, पारंपरिक बॅँड, बेंजोपथक, फुलांच्या पायघड्या, बंदुकीच्या फैरींची सलामी, श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची भेट, छत्रपतींच्या हस्ते कुमारिका पूजन, कोहळा छेदन विधीने शनिवारी त्र्यंबोली यात्रा झाली. गुरव घराण्यातील आर्या गुरव या कुमारिकेच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा छेदन विधी झाला. यावेळी कोहळ्याचे तुकडे मिळविण्यासाठी तरुणांनी हुल्लडबाजी केली. त्यांना पांगविण्यासाठी पोेलिसांनी सौम्य लाठीमार केला.

शारदीय नवरात्रौत्सवात ललितापंचमीला श्री अंबाबाई आपल्या लव्याजम्यानिशाी आपली प्रिय सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाते व येथे कोहळा छेदन विधी होतो. यानिमित्त शनिवारी सकाळी दहाच्या अभिषेकानंतर श्री अंबाबाईची पालखी मंदिरातून निघाली. उमा टॉकीज, बागल चौकमार्गे टाकाळा येथे आली. येथे विसावा आणि भाविकांकडून पूजा स्वीकारल्यानंतर अंबाबाईची पालखी त्र्यंबोली टेकडीवर आली.

सोबतच जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीच्या पादुका व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली पालखी व गुरुमहाराजांचीही पालखी आली. रांगोळी आणि फुलांच्या पायघड्यांनी आणि बंदुकीच्या फैरी झाडून या देवांचे स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती. गाभाऱ्यात श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती व त्र्यंबोली देवीची भेट झाली. आरतीनंतर खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते व माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे यांच्या उपस्थितीत गुरव घराण्यातील आर्या गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा छेदन विधी झाला. यावेळी कोहळ्याचे तुकडे घेण्यासाठी तरुणांनी पळापळ सुरू केली. त्यांच्या हुल्लडबाजीला लगाम घालण्यासाठी व गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पान-सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व तीनही पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. वाटेत भाविकांकडून रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करण्यात आले.

गर्दी कमी
यंदा प्रथमा आणि द्वितीया या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्या होत्या. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या चौथ्याच दिवशी ललितापंचमी आली. मात्र, ही बाब भाविकांच्या पटकन लक्षात आली नाही. शिवाय सध्या आॅक्टोबर हीट सुरू आहे. या दोन्ही गोष्टींचा परिणाम यात्रेतील गर्दीवर झाला. टेकडीवर भाविकांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत कमी होती. कोहळ्यासाठी झालेली झटापट वगळता सर्वत्र शांतता होती.
 

विविध संस्थांकडून सेवा
रोटरी क्लब आॅफ शिरोली एमआयडीसी, श्री जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथी कॉलेज व आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्र्यंबोली मंदिराच्या परिसरात प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले; तर पालखीच्या मार्गात राजाराम गार्डन, शहीद भगतसिंग तरुण मंडळ, बागल चौक मंडळ, समाजसेवा मंडळ, जिद्द युवक संघटना, इंडियन फ्रेंड्स सर्कल, एकता मित्रमंडळ, बास्को ग्रुप, श्री टाकाळा मित्रमंडळ अशा विविध संस्था, संघटनांकडून पालखीचे स्वागत व प्रसाद वाटप करण्यात आले.

Web Title: Sangbam meeting of Shri Ambabai-Trimboli Devi: a flock of devotees for Goddess; Polite lathamar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.