सांगली आणि संगीताचे सुसंस्कृततेचे नाते : सुप्रिया सुळे

By admin | Published: February 6, 2015 10:55 PM2015-02-06T22:55:25+5:302015-02-07T00:12:10+5:30

अ ब क ड संगीत महोत्सव : पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा सत्कार

Sangli and music's cultural affair: Supriya Sule | सांगली आणि संगीताचे सुसंस्कृततेचे नाते : सुप्रिया सुळे

सांगली आणि संगीताचे सुसंस्कृततेचे नाते : सुप्रिया सुळे

Next

सांगली : देशातच नव्हे, तर जगात ज्या कुटुंबियांबद्दल प्रत्येकाच्या मनात नितांत आदराची भावना आहे, ते मंगेशकर कुटुंब हे सांगलीचे असल्याने संगीत आणि सांगलीचे सुसंस्कृततेचे अतूट नाते असल्याचे भावोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी आज, शुक्रवारी व्यक्त केले. येथील तरुण भारत क्रीडांगणावर आयोजित अ ब क ड कल्चरल ग्रु्रपच्यावतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खा. सुळे बोलत होत्या. याप्रसंगी सांगलीकरांच्यावतीने खा. सुळे यांच्याहस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गीतांवर आधारित ‘हृदयगाणी’ हा प्रसिध्द सूत्रसंचालिका मंगला खाडिलकर निर्मित कार्यक्रम सादर करण्यात आला.खा. सुळे म्हणाल्या, मंगेशकर कुटुंबियांबद्दल प्रत्येकाच्या मनातच आदराची भावना आहे. त्यांच्या कुटुंबियांतीलच मास्टर दीनानाथांचे सुपुत्र असणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच आहे. मंगेशकर हा एक प्रकारचा ब्रॅँड आहे. संगीतामध्ये त्याने विश्वास संपादन केला आहेच, त्याचप्रमाणे पुण्यात असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानेही सर्वसामान्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण केली आहे. मंगेशकर कुटुंबातील सात भावंडांचा जन्म सांगलीतच झाला आहे. साहजिकच सांगली आणि मंगेशकर यांचा ऋणानुबंध आहे. माझ्यावर जे संगीताचे संस्कार झाले, त्यामध्ये मंगेशकर कुटुंबियांचा फार मोठा हातभार आहे.सत्काराला उत्तर देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, मंगेशकर कुटुंबियांचा गौरव केल्याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास जागा मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील यांचे किती मोलाचे सहकार्य मिळाले, याचा किस्सा सांगितला. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अ ब क ड ग्रुपचे शरद मगदूम, स्मिता मगदूम, प्रवीणशेठ लुंकड, माणिकराव जाधव, किर्लाेस्कर ग्रुपचे प्रकाश पुदाले, रघुनाथ गिड्डे आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर ‘मोगरा फुलला’ या गीताने ‘हृदयगाणी’ कार्यक्रमास प्रारंभ झाला. ‘कानडा विठ्ठलू कर्नाटकू’... आदी अजरामर गीते सादर झाली. (प्रतिनिधी)

नाट्यगृहासाठी सहकार्य
अ ब क ड कल्चरल ग्रुपच्यावतीने सातत्याने २३ वर्षे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून नाट्यगृह बांधण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी खंबीरपणे ग्रुपच्या मागे उभे राहावे, असे आवाहन अ ब क ड चे शरद मगदूम यांनी केले होते. तोच धागा पकडून आपल्या भाषणात खा. सुळे यांनी, सांगलीत नाट्यगृह निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
राजकारणात असल्याने एकदा माईक हातात आला की तो लवकर सुटत नाही. परंतु संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार असल्याने, मी तुमचा जास्त वेळ घेणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी भाषणाचा प्रारंभ करतानाच सांगितले.

Web Title: Sangli and music's cultural affair: Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.