सांगली --चक्का जाम!
By admin | Published: January 31, 2017 11:48 PM2017-01-31T23:48:42+5:302017-01-31T23:48:42+5:30
मराठा समाज दोन तास रस्त्यावर : ४७४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह सर्वत्र दोन तास ‘चक्का जाम’ आंदोलन झाले. त्यामुळे अनेक मार्गांवर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. ६ मार्चपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्र्यांना फिरू द्यायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील ४७४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले.
जिल्ह्यात सर्वत्र या आंदोलनास पाठिंबा मिळाला. सांगलीत अंकली फाटा, इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, कर्नाळ रस्ता, कुपवाड रस्त्यावर भारत सूतगिरणी, सांगलीवाडी टोल नाका, माधवनगर रस्त्यावर साखर कारखान्यासमोर, पुणे-बंगलोर महामार्गावर वाघवाडी फाटा, मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा, आष्टा, बावची फाटा, घाटनांद्रे, नागज फाटा, दिघंची, आटपाडी, देशिंग, भिवघाट, कवठेमहांकाळ, जत, उमदी, पलूस, कडेगाव, रामानंदनगर, पाचवा मैल, भिलवडी, अंकलखोप, वसगडे, कवठेएकंद, तासगाव, शिराळा, कासेगाव येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ४७४ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले.
आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. जिल्हाभर आंदोलन करून मराठी बाणा दाखवून दिला, असे संजय देसाई व डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगलीतील आंदोलनामध्ये पृथ्वीराज पवार, शिवाजी मोहिते, संग्राम चव्हाण, सतीश साखळकर, योगेश पाटील, श्रीरंग पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पोळ, विजय भोसले, योगेश पाटील, सुधीर भगत, नीलेश पाटील, महेश खराडे, सुधाकर पाटील, माधवनगर रस्त्यावर अक्षय पाटील, आटपाडी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, तर आष्ट्यात वैभव शिंदे, सुयोग औंधकर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)