‘एड्स’मध्ये सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Published: November 30, 2015 11:51 PM2015-11-30T23:51:25+5:302015-12-01T00:15:44+5:30

माणिक सांगळे : वर्षभरात २९ जणांचा मृत्यू

Sangli district second in 'AIDS' | ‘एड्स’मध्ये सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

‘एड्स’मध्ये सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Next

सांगली : ‘एड्स’ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे; परंतु तरीही आकडेवारीनुसार, सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण होण्यात जिल्हा नवव्या क्रमांकावर आहे. एड्सची लागण झालेल्या २९ रुग्णांचा वर्षभरात मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, एचआयव्हीची लागण, एड्सने मृत्यूचे प्रमाण व गर्भवती महिलांना लागण होण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुुरू आहेत. देहविक्री करणाऱ्या महिला व समलिंगी संबंध ठेवणारा वर्ग यांच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून त्यांचे समुपदेशन व आरोग्य तपासणी केली जात आहे. या गटाशी संबंधित व कामानिमित्त स्थलांतर होणारा ट्रकचालक, क्लिनर हा एक वर्ग आहे. त्यांचेही समुपदेशन व तपासणी केली जाते. समुपदेशन व तपासणीसाठी जिल्ह्यात २० केंद्रे आहेत. तसेच ज्यांना लागण झाली आहे, त्यांना औषधे देण्यासाठी चार एआरटी सेंटर्स आहेत. जनजागृतीसाठी आरोग्य यंत्रणा कधीही कमी पडलेली नाही; पण लोकांनी काळजी घेतली पाहिजे. २००४ मध्ये अठराशे रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ४४८ रुग्णांना एड्सची लागण झाली होती. त्यानंतर प्रत्येकवर्षी लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढतच गेले आहे. यावर्षी सुमारे ५५ हजार ४३० रुग्णांची तपासणी केली. यात बाराशे रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले की, गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण होण्याच्या प्रमाणात घट झाल्याने जिल्ह्याचा राज्यात नववा क्रमांक लागतो. यावर्षी ४५ हजार ४९२ गरोदर मातांची तपासणी केली. यातील ५१ महिलांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी १३ महिला बाहेरील जिल्ह्यातील आहेत. सर्वसाधारण प्रमाणात आकडेवारीनुसार जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांक पुण्याचा, सोलापूर तृतीय, तर सातारा जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी एड्सची लागण झालेल्या ८६ रुग्णांचा गतवर्षी, तर चालूवर्षी २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)


आजपासून विविध कार्यक्रम
आज १ डिसेंबरला जागतिक एड्स दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
आज शासकीय रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर मुख्य बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांत प्रबोधनात्मक व्याख्याने दिली जाणार आहेत. ५ डिसेंबरला राजवाडा चौक ते मिरजेतील मिशन हॉस्पिटल चौकापर्यंत स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे, असेही डॉ. सांगळे यांनी सांगितले.

Web Title: Sangli district second in 'AIDS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.