सांगलीत डॉक्टर दाम्पत्यास अटक

By admin | Published: August 14, 2015 11:03 PM2015-08-14T23:03:44+5:302015-08-14T23:03:44+5:30

चौकशीत दोषी : मुलाचा मृत्यू प्रकरण

Sangli doctor doctor arrested | सांगलीत डॉक्टर दाम्पत्यास अटक

सांगलीत डॉक्टर दाम्पत्यास अटक

Next

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील दिगंबर चंद्रकांत आरते (वय ६) या मुलाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याप्रकरणी पंचमुखी रस्त्यावरील नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. भूषण विश्वास कुलकर्णी (वय ३७) व त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती (३६) यांना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी वैद्यकीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी सुरू होती. चौकशीत कुलकर्णी दाम्पत्य दोषी आढळल्याने अखेर त्यांच्याविरुद्ध दिगंबरच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे.दिगंबर यास टॉन्सिलचा त्रास होता. यासाठी त्याचे वडील चंद्रकांत आरते हे त्याला घेऊन कुलकर्णी यांच्या रुग्णालयात गेले होते. कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार ३० एप्रिल २०१५ रोजी दिगंबरला शस्त्रक्रियेसाठी कुलकर्णी यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. साडेदहा वाजता शस्त्रक्रिया पूर्ण आणि यशस्वी झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले होते. तथापि, दिगंबर शुद्धीवर आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. तो रडू लागला. त्यामुळे ज्योती कुलकर्णी यांनी दिगंबरला इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडत गेली. कुलकर्णी दाम्पत्याने त्यास दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. वडिलांनी त्याला तातडीने तेथून हलविले, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. कुलकर्णी दाम्पत्याच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप चंद्रकांत आरते यांनी केला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीचा अहवाल राखून ठेवला होता. त्यामुळे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. हे प्रकरण चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडे गेले होते. सहाजणांची ही समिती होती. त्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासाची तसेच कुलकर्णी दाम्पत्याने केलेल्या औषधोपचाराची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तीन महिन्यांपासून समितीकडून चौकशी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी चौकशीचे काम पूर्ण झाले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी जी काळजी घ्यायला हवी ती कुलकर्णी दाम्पत्याने घेतली नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच दिगंबरचा मृत्यू झाल्याचे समितीने चौकशीत म्हटले आहे. तसा अहवालही त्यांनी पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी कुलकर्णी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. याप्रकरणी चंद्रकांत आरते यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)



पोलीस हात हलवित परतले
पोलीस उपनिरीक्षक आर. के. वाईकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. कुलकर्णी दाम्पत्याला अटक करण्यासाठी वाईकर यांचे पथक शुक्रवारी सकाळी त्यांच्या रुग्णालयात गेले होते, पण डॉक्टर दाम्पत्य महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत असल्याचे समजल्याने पथक हात हलवित परतले. मात्र, त्यांनी या दाम्पत्याला दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार ते हजर झाल्यानंतर
अटक केली.
रक्तस्त्रावामुळे मृत्यू
दिगंबरच्या विच्छेदन तपासणीचा अहवाल राखून ठेवून व्हिसेरा काढून घेण्यात आला होता. तपासणीसाठी तो पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवालही दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. यामध्ये शस्त्रक्रियेनंतर दिगंबरच्या घशातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हे रक्त फुफ्फुसात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

Web Title: Sangli doctor doctor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.