सोने व्यापाऱ्यांना लुटणारी सांगलीतील टोळी गजाआड, मावसभावानेच मित्रांसोबत रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:29 PM2022-05-11T17:29:55+5:302022-05-11T17:45:27+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ...
रत्नागिरी : कोकण रेल्वेत दोन सोने व्यापाऱ्यांकडील सुमारे २७ लाख ८६ हजारांची रोकड लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी जेरबंद केले आहे. त्यातील एका व्यापाऱ्याचा मावसभाऊ या टोळीमध्ये असून, त्यानेच या चोरीचा कट आखल्याचे तपासात पुढे आले आहे. या टोळीकडून पोलिसांनी २७ लाख ८६ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
सांगली येथील प्रसिद्ध सोने व्यापारी प्रशांत भीमराव माने व विनोद रावसाहेब महीम हे दोघे केरळ येथे होलमार्क मशीन खरेदीसाठी २७ लाख ८६ हजारांची रोकड घेऊन जात होते. १ मे रोजी ते रत्नागिरीतून जामनगर तिरुवल्ली एक्सप्रेसने केरळकडे निघाले. पैशाची बॅग त्यांनी सीटखाली ठेवली. मात्र थोड्याचवेळात ती बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत रेल्वे सुटल्याने ते कणकवली स्थानकात पोहचले. तेथून रत्नागिरीत येऊन त्यांनी चोरीची तक्रार दिली.
पोलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी तत्काळ एक पथक नेमले. व्यापारी रत्नागिरीत आले, तेव्हा त्यांच्या संपर्कातील कोण कोण रेल्वे स्थानकात होते का, याचा शोध सुरु झाला. महीम यांचा मावस भाऊ सुरज बाळासाे हसबे (३९,रा. खानापूर, सांगली, सध्या रा. केरळ) रेल्वे स्थानकात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
सर्व प्रथम सुरजला केरळमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीची कबुली दिली. आपले सहकारी सांगलीत असून रक्कम त्यांच्याकडेच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शहर पोलिसांचे दुसरे पथक सांगलीकडे गेले. तेथे पोलिसांनी उमेश सूर्यगंध (३४, रा. वाळवा, सांगली), अजय शिंदे (२१, मंगरुळ, सांगली), तुषार शिंदे (२२, रा. मंगरुळ, सांगली), यश वेदपाठक (१९, रा. हिवरे सांगली), विकास चंदनशिवे (२३, पारे, सांगली) या पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांनी कट रचून ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सांगलीतील वीटा येथून सहाजणांना रोख रकमेसह चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, उपनिरीक्षक आकाश साळुंखे, हवालदार प्रवीण बर्गे, पोलीस नाईक गणेश सावंत, विलास जाधव, मालोकर, प्रसाद घोसाळे, वैभव नार्वेकर हे या कारवाईत सहभागी होते.