सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प
By admin | Published: December 19, 2015 12:59 AM2015-12-19T00:59:36+5:302015-12-19T01:17:45+5:30
अंकलीत ‘स्वाभिमानी’चा चक्का जाम : तीन तास आंदोलन, सांगलीतील कारखान्यांना ८०:२० प्रमाणे ऊसदर मान्य
जयसिंगपूर : सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली-कोल्हापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. अंकली टोलनाका येथे सकाळी ११ वाजता ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला होता. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ८०:२० प्रमाणे दर देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गुरुवारी बैठक घेऊन
८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणेच सर्वच कारखान्यांनी दर द्यावा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली असून, सांगली जिल्ह्यात सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी चक्का जाम आंदोलन पुकारले होते. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, मिलिंद साखरपे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली-कोल्हापूर महार्गावरील अंकली टोलनाका येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलनास प्रारंभ झाला. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०:२० फॉर्म्युल्याप्रमाणे दर देण्याचे मान्य केले असल्याची माहिती सावकर मादनाईक यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विठ्ठल मोरे, शैलेश आडके, सागर मादनाईक, शैलेश चौगुले, गुंडा कोरे, शांताराम पाटील, सागर शंभुशेटे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)