सांगलीत भाडेकरु ने मारला साडेचार लाखांवर डल्ला
By admin | Published: June 19, 2017 12:53 AM2017-06-19T00:53:26+5:302017-06-19T00:53:26+5:30
शिरोळच्या तरुणाविरुद्ध गुन्हा : दागिन्यांसह रोकड लंपास
सांगली : येथील शिंदे मळ्यातील मेहमुदा खुदबुद्दीन कोतवाल यांच्या घरात भाडेकरु संदीप अशोक भोसले (वय २७, रा. नदीवेस, शिरोळ, जि. कोल्हापूर) याने चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारुन पलायन केले आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पंधरा तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, तीन हजाराची रोकड असा ऐवज त्याने लंपास केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहमुदा कोतवाल आरवाडे पार्कमधील मयुर कॉलनीत राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संदीप भोसले यास भाडेकरु म्हणून ठेवले आहे. तो एका कारखान्यात काम करीत होता. शुक्रवारी दुपारी कोतवाल कुटुंब घराला कुलूप लाऊन कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान संदीप भोसले याने कोतवाल यांच्या घराचे कुलूप बनावट चावीने उघडून प्रवेश केला.
बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकही बनावट चावीने उघडले. लॉकरमधील सोन्याच्या दोन पाटल्या, नेकलेस, कर्णफुले, दोन अंगठ्या, सोनसाखळी, डायमंडची कर्णफुले, तीन हजाराची रोकड व अकरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट असा एकूण तीन लाख ८९ हजारांचा ऐवज घेऊन पलायन केले.
दुपारी साडेतीन वाजता कोतवाल कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यादिवशी भोसलेही घरी आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानेच चोरी केल्याची खात्री पटल्यानंतर कोतवाल यांनी फिर्याद दाखल केली.