सांगली महापौर निवडीचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात : भाजप कोअर कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:14 AM2018-08-14T00:14:46+5:302018-08-14T00:20:06+5:30
महापालिकेच्या भाजपच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदाबाबत सोमवारी कोअर कमिटीची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. इच्छुकांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला. बुधवारी, १५
सांगली : महापालिकेच्या भाजपच्या पहिल्या महापौर व उपमहापौर पदाबाबत सोमवारी कोअर कमिटीची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांच्या नावावर चर्चा करण्यात आली. इच्छुकांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला. बुधवारी, १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत दोन्ही पदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेतील २० वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला धोबीपछाड देत भाजपने सत्तांतर घडविले. भाजपकडे अपक्षांसह ४२ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसकडे २० व राष्ट्रवादीकडे १५ नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर पदाची निवड २० आॅगस्ट रोजी होणार असून, १६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. महापौर पदासाठी भाजपकडून आठजण इच्छुक आहेत. ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित आहे.
या पदासाठी सविता मदने, कल्पना कोळेकर, गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सरगर, संगीता खोत, अनारकली कुरणे, नसीम नाईक यांची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान पटकाविण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दीपक शिंदे-म्हैसाळकर, मुन्ना कुरणे, सुरेश आवटी उपस्थित होते.
मिरजेचे आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर हे बाहेरगावी असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. तरीही महापौर, उपमहापौर पदाबाबत प्राथमिक चर्चा झाली. इच्छुकांची नावे प्रदेश समितीकडे पाठवून पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन घेण्याचे ठरले. तसेच १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देशमुख सांगली दौºयावर आहेत. या दिवशी पुन्हा कोअर कमिटीची बैठक घेऊन महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
समीकरण जुळविण्याची धडपड
पुढीलवर्षी होणाºया लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार करून पदांचे वाटप करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. महापौरपद सांगलीला दिले गेले, तर उपमहापौरपद कुपवाड अथवा मिरजेला द्यावे, तसेच स्थायी समिती सभापती, गटनेतेपदासाठी अनुभवी नगरसेवकांचा विचार व्हावा, असा सूरही बैठकीत निघाला. विविध पदांबाबत जातीय समीकरणांची सांगडही घालण्यात आली. धनगर समाजाला महापौरपद मिळाल्यास मराठा समाजाचा उपमहापौर करावा, गटनेतेपद, स्थायी सभापतीपद इतर समाजाला द्यावे, अशा फॉर्म्युल्यावरही चर्चा करण्यात आली.
काँग्रेसची बुधवारी बैठक
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे लढविली जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ संख्याबळ असून स्वाभिमानीचे नगरसेवक विजय घाडगे यांचा दोन्ही काँग्रेसला पाठिंबा मिळू शकतो. महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदवारांसह विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यासाठी काँग्रेसची बुधवारी बैठक होणार आहे. महापौर पदासाठी काँग्रेसकडून वर्षा निंबाळकर, वहिदा नायकवडी यांना मैदानात उतरविले जाऊ शकते, तर राष्ट्रवादीतून उपमहापौर पदाचा उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न आहेत.
चारजणी शर्यतीत
महापौर पदासाठी भाजपकडून आठ नगरसेविका इच्छुक असल्या तरी, चार जणींची नावे सर्वात आघाडीवर आहेत. यात सविता मदने, संगीता खोत, अनारकली कुरणे व कल्पना कोळेकर यांचा समावेश आहे. यातील मदने व कोळेकर या दोघी पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या आहेत, तर खोत व कुरणे या दोघी गेली दहा वर्षे नगरसेविका आहेत. दोघीही अनुक्रमे जनता दल व काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सामील झाल्या होत्या.