सांगली-सातारा कॉँग्रेस स्वबळावर लढणार
By Admin | Published: October 22, 2016 11:27 PM2016-10-22T23:27:08+5:302016-10-23T00:52:05+5:30
े. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.
सांगली : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची जागा काँग्रेसला दिली नाही, तर ही जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय शनिवारी काँग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांनी याबाबतचा आग्रह धरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अन्य ठिकाणच्या जागांबद्दल आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असले तरी, यातील बहुतांश जागांवर स्वबळाचाच आग्रह स्थानिक नेत्यांकडून धरला जात आहे.
मुंबईतील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. मधुकरराव चव्हाण, खा. हुसेन दलवाई, भाई जगताप, आदी उपस्थित होते. सांगलीतून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील उपस्थित होते.
सांगली-सातारा विधान परिषदेची जागा काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे सांगली-सातारा जिल्ह्यांतील नेत्यांनी अशोक चव्हाण यांना सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे ही जागा काँग्रेसला देण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी या गोष्टीस नकार दिला, तर स्वबळावर काँग्रेस ही जागा लढेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेच्या अन्य जागांविषयीसुद्धा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी केली जात आहे. तरीही याविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येईल, असे चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मुंबईत झाल्यानंतर सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेसकडून इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त जाहीर केला. (प्रतिनिधी)
चर्चेपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी उमेदवारीची घोषणा करून आघाडीचे संकेत मोडले आहेत. सांगली-सातारा विधान परिषदेच्या जागेचे गणित फिसकटले, तर अन्य जागांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्यस्थितीत आघाडी तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे घडले तर दोन्ही पक्षांना कमी-अधिक तोटा होणार आहे. दोन्ही काँग्रेसमधील संघर्षाचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी