सांगलीत गायकवाडच्या घरावर छापा
By admin | Published: September 17, 2015 12:49 AM2015-09-17T00:49:49+5:302015-09-17T00:50:50+5:30
पोलिसांची कारवाई : कडेकोट बंदोबस्त, दिवसभर झडती, कुटुंबीयांचीही चौकशी सुरू
सांगली : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. मोती चौक) याला पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतल्याचे वृत्त बुधवारी दुपारी सांगलीत येऊन धडकताच एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या पथकाने समीरच्या घराचा ताबा घेतला असून, वीसजणांचे पथक येथे थांबून आहे. दिवसभर त्याच्या घराची झडती आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. नागरिकांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली होती.
सांगलीच्या मोती चौकातील धनगर गल्लीत समीर गायकवाड याचे ‘भावेश्वरी छाया’ नावाचे घर आहे. मंगळवारी रात्री कोल्हापूर व सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केली. बुधवारी सकाळीच सांगली पोलिसांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, विश्रामबाग पोलीस ठाणे व सीआयडीच्या पथकाने त्याच्या घराचा ताबा घेतला. दिवसभर घराची झडती सुरू होती. त्याच्या घरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. प्रवेशद्वारावर पोलीस थांबून होते.
पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, एलसीबीचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, विश्रामबागचे निरीक्षक अनिल चोरमुले यांच्यासह पंधरा ते वीसजणांच्या पथकाकडून घराची तपासणी सुरू होती. समीरची आई शांता, भाऊ सचिन, भावजय व पुतणे, आजोबा असा परिवार सांगलीत राहत आहे. त्यांच्याकडे दिवसभर कसून चौकशी सुरू होती. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते.
समीरच्या घरात काही आक्षेपार्ह सापडले का, याबाबत मात्र पोलिसांनी मौन पाळले आहे. दिवसभर झडती सुरू असली तरी काही कागदपत्रे, छायाचित्रे पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेऊन कोल्हापूरला नेल्याचे समजते. (प्रतिनिधी)
कोण हा समीर गायकवाड...
समीर गायकवाड गेल्या सतरा वर्षांपासून सनातन संस्थेचा साधक आहे. त्याचे वडील विष्णू गायकवाड येथील आकाशवाणी केंद्रामध्ये शिपाई होते. सात वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे.
समीरला सचिन व संदीप असे दोन भाऊ असून, त्यापैकी एक सांगलीत, तर दुसरा संकेश्वर (कर्नाटक) येथे आजोळी असतो.
समीरचे शिक्षण संकेश्वर येथेच झाले आहे. त्याचे कुटुंबच सनातनचे साधक असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्याची पत्नी सनातन संस्थेतच आहे, पण सध्या ते दोघे विभक्त झाल्याचे सांगण्यात आले.
समीरने चार वर्षांपूर्वी सांगलीतील जवाहर चौकात मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. काही वर्षातच त्याने हे दुकान बंद केले. त्यानंतर तो सांगलीतून गायब झाला. अधूनमधून तो सांगलीत येत असे, असे शेजाऱ्यांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याचे सांगलीत येणे-जाणे कमी झाले होते.
‘सनातन’शी संबंध
समीरचे सनातन संस्थेशी घनिष्ठ संबंध आहेत. मडगाव (गोवा) येथील बॉम्बस्फोटातील सनातनचा साधक मृत मलगोंडा पाटील याचा तो मित्र होता. मलगोंडा सांगलीत असताना त्याच्याशी मैत्रीचे सूर जुळले होते. याच प्रकरणातील आणखी एका संशयिताशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. त्याची पत्नी डॉ. हर्षदा ही गोवा येथील सनातन संस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
समीर गायकवाड याच्याविरोधात सांगली पोलिसांत आजपर्यंत कोणताही गुन्हा नोंद नाही. तो पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. तरीही पोलिसांनी सांगली, विश्रामबाग व मिरज शहर पोलीस ठाण्यातील संपूर्ण रेकॉर्ड तपासणी हाती घेतली आहे. यापूर्वी कोणता गुन्हा नोंद आहे का, याची खातरजमा सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.