सांगलीत दागिन्यांची तिजोरीच लंपास

By admin | Published: February 8, 2016 11:14 PM2016-02-08T23:14:14+5:302016-02-08T23:25:47+5:30

व्यापाऱ्याचा बंगला फोडला : सव्वाचार लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

Sangliat jewelery worth crores lump | सांगलीत दागिन्यांची तिजोरीच लंपास

सांगलीत दागिन्यांची तिजोरीच लंपास

Next

सांगली : येथील गणपती पेठेतील व्यापारी कपिल किशोर कांकाणी यांचा वखारभागातील बंगला फोडून चोरट्यांनी सव्वाचार लाखांचे दागिने व रोकड असलेली तिजोरीच पळवून नेली आहे. चोरट्यांनी सुरुवातीला तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश न आल्याने तिजोरीच पळविली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, कांकाणी यांनी सोमवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कपिल कांकाणी यांचे गणपती पेठेत कांकाणी इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. त्यांचा वखारभागातील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पतसंस्थेजवळ दोनमजली बंगला आहे. शनिवारी दुपारी साडेचार वाजता ते कुटुंबासह सातारा येथे नातेवाइकांकडे गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे ते दुसऱ्या मजल्यावर गेले. कपाट उघडून साहित्य विस्कटून टाकले. यामध्येही काहीच मिळाले नाही. शेवटी त्यांची नजर एका लहान लोखंडी तिजोरीवर गेली. ही तिजोरी त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी तिजोरीच पळवून नेली. तिजोरीत अमेरिकन डायमंड सेट, सोन्याचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, अंगठी, चेन, रिंगा, चार नथ, पदक, नेकलेस, चांदीचे पूजेचे साहित्य व ३५ हजारांची रोकड असा ४ लाख २१ हजारांचा ऐवज होता.
कांकाणी कुटुंब रविवारी सकाळी साडेअकरा वाजता साताऱ्याहून सांगलीत परतले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपअधीक्षक (गृह) रावसाहेब सरदेसाई, निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले होते. कांकाणी यांच्या घराजवळच श्वान घुटमळले. रात्री उशिरा कांकाणी यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

तिजोरी २५ किलोंची
कांकाणी यांच्या घरातील लोखंडी तिजोरी जुन्या काळातील होती. यामध्ये ते घरातील किमती ऐवज ठेवत होते. २५ किलो वजनाची ही तिजोरी होती. स्थानिक चोरट्यांनी पाळत ठेवून ही चोरी केल्याची शक्यता आहे. दोन ते तीन चोरटे असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Sangliat jewelery worth crores lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.