सांगलीत रिव्हॉल्व्हर जप्त

By admin | Published: June 25, 2014 01:03 AM2014-06-25T01:03:07+5:302014-06-25T01:04:05+5:30

गुन्हेगारास अटक : काडतुसेही सापडली; टारझन टोळीकडून पुरवठा

Sangliat Revolver seized | सांगलीत रिव्हॉल्व्हर जप्त

सांगलीत रिव्हॉल्व्हर जप्त

Next

सांगली : निपाणी (ता. चिकोडी) येथील स्वप्नील शिवाजी कुंभार (वय २२) या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकात आज (मंगळवार) दुपारी थरारक पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर, पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो ही शस्त्रे येथे विकायला आला होता. गुंड सचिन ऊर्फ टारझन जाधव याच्या टोळीतील प्रसन्न ऊर्फ सोन्या पांडुरंग कुलकर्णी-पाटील याने सहा महिन्यांपूर्वी ही शस्त्रे पुरविल्याची कबुली त्याने दिली आहे.
जिल्ह्यात शस्त्रांची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुंडाविरोधी पथकास कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर नजर ठेवली होती.
स्वप्नील कुंभार आज दुपारी झुलेलाल चौकात रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने चौकात सकाळपासून ठिय्या मारला होता. दुपारी दोनला कुंभार रिक्षातून उतरला. तो झुलेलाल चौकातून आंबेडकर रस्त्याकडे निघाला होता. त्यावेळी पथकाने त्याला हेरले. पोलीस असल्याची चाहूल लागताच त्याने पलायन केले.
मात्र पथकाने थरारक पाठलाग करून त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर दोन रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे सापडली. त्याची किंमत १ लाख ६९० रुपये आहे.
कुंभारला उद्या (बुधवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांची कसून चौकशी केली. तीन महिन्यांपूर्वी कऱ्हाड पोलिसांनी सच्या टारझनकडून कऱ्हाडमध्ये चार रिव्हॉल्व्हर जप्त केली होती. त्यापाठोपाठ सांगली पोलिसांनीही टाझनचा साथीदार सोन्या कुलकर्णीसह दोघांकडून चार रिव्हॉल्व्हर व ३२ काडतुसे जप्त केली होती.
तेव्हापासून हे सर्वजण कारागृहात आहेत. सोन्याला आता पुन्हा या गुन्ह्यात न्यायालयाची परवानगी घेऊन अटक केली जाणार आहे. टारझनचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यालाही अटक केली जाईल, असे पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप बुवा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Sangliat Revolver seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.