पहिल्या टप्प्यात सांगलीकरांची निराशा
By admin | Published: October 31, 2014 11:50 PM2014-10-31T23:50:01+5:302014-10-31T23:51:11+5:30
राज्य मंत्रिमंडळ : खाडे, नाईकांना संधी शक्य
सांगली : भाजपला चार आमदारांचे बळ पुरवणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या वाट्याला राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात एकही मंत्रीपद न आल्याने जिल्ह्यात काहीशी नाराजी पसरल्याचे चित्र आहे.
दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात पहिल्यांदाच जतमधून भाजपचे ‘कमळ’ फुलवून सुरेश खाडे आमदार झाले. त्यानंतर सलग दोनवेळा त्यांनी मिरजेतून भाजपला यश मिळवून दिले. त्यांच्यासोबत चारवेळा विधानसभेत प्रवेश करणारे शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचेही नाव मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल चर्चेत होते. आ. खाडे यांनी यंदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, ते अनुसूचित जाती वर्गातील असल्याने ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्यासाठी त्यांना पहिल्या टप्प्यातच मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. आज (शुक्रवारी) सकाळपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती, तर मंत्रीपदाचा आणि प्रशासनाचा अनुभव व खा. राजू शेट्टी यांच्याशी जवळीक यामुळे नाईक यांना मंत्रीपद नक्की मिळणार, असे सांगितले जात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘शिवाजीरावांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री करतो’ अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे नाईकांना मंत्रीपद दिले जाईल, अशी अपेक्षा सांगलीकरांना होती.
गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातील पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, अजितराव घोरपडे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. या ‘हेवीवेट’ मंत्र्यांमुळे राज्याच्या राजकारणात सांगलीचा दबदबा होता. आता भाजपच्या मंत्रिमंडळात खाडे, नाईकांना पहिल्या टप्प्यात मंत्रीपद देऊन सांगलीचा दबदबा कायम राखला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या दोघांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.(प्रतिनिधी)