सांगलीत भरदिवसा ११ लाख पळवले
By admin | Published: November 18, 2014 01:00 AM2014-11-18T01:00:01+5:302014-11-18T01:03:47+5:30
जिल्ह्यात नाकाबंदी : चोरट्यांचा ‘धूम स्टाईल’ थरार
सांगली : बुलडाणा अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोरील आयडीबीआय बँकेतून काढलेली सुमारे ११ लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी भरदिवसा हातोहात पळविली. आज, सोमवारी दुपारी सव्वाबाराला ‘धूम स्टाईल’ने हा थरार घडला. चोरट्यांच्या शोधासाठी तातडीने नाकाबंदी करण्यात आली. मात्र चोरटे सापडले नाहीत. शहरात गेल्या बारा दिवसांतील पैसे चोरीची ही दुसरी घटना आहे.बुलडाणा अर्बन सोसायटीची चांदणी चौकात शाखा आहे. या शाखेतील लिपिक सुनील इराप्पा दोकडे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव, ता. मिरज) यांच्याकडे बँकेतील रक्कम काढून सोसायटीत जमा करण्याची जबाबदारी असते. आज सकाळी शाखाधिकारी विनायक लोहार यांनी दोकडे यांना जिल्हा परिषदेजवळील आयडीबीआय बँकेतून ११ लाखांची रोकड काढून आणण्यासाठी धनादेश दिला.
चोरट्यांचे रेखाचित्र
चोरट्यांची काळ्या रंगाची दुचाकी होती. पाठीमागे बसलेल्या चोरट्यानेच हेल्मेट घातले होते. त्याच्या अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट होता. त्याने दोकडे यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही अथवा झटापटही केली नाही. दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याचा चेहरा दोकडे यांच्यासह बँकेबाहेर उभ्या असलेल्या काही नागरिकांनी पाहिला आहे. यावरून त्याचे रेखाचित्र बनविण्याचे काम सुरू आहे. बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे. भरदिवसा घटना घडूनही कोणीही चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक टिपला नाही.