सांगलीची सुमित ड्रामा अकॅडमी प्रथम
By admin | Published: February 16, 2016 12:58 AM2016-02-16T00:58:09+5:302016-02-16T01:06:46+5:30
‘फिनिक्स हास्य गौरव २०१६’ ची अंतिम फेरी दिमाखात; कोल्हापूर तृतीय
कोल्हापूर : ‘फिनिक्स हास्य गौरव-२०१६’ या राज्यस्तरीय प्रहसन स्पर्धेत सांगलीतील सुमित ड्रामा अकॅडमीने प्रथम, पुण्याच्या समर्थ अकॅडमीने द्वितीय, तर कोल्हापूरच्या के. पंडित यांनी तिसरा क्रमांक मिळविला. रविवारी (दि. १४) रात्री उशिरा या स्पर्धेचा निकाल लागला. विजेत्यांना १५ हजारांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत रोख बक्षिसे व फिनिक्स हास्य गौरव चषक देण्यात आला.
या राज्यस्तरीय प्रहसन स्पर्धेची अंतिम फेरी येथील राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरज, सोलापूर, रत्नागिरी, परभणी, लातूरसह अनेक शहरांतून ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातून १५ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले होते.
‘फिनिक्स’चे अध्यक्ष संजय मोहिते,अभिनेत्री राजश्री खटावकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सेलिब्रेटी कॉमेडी परफॉर्मन्स दीपक बिडकर यांच्या गु्रपचे बहारदार स्क्रीप्टस् व डान्स परफॉर्मन्स सादर केले. यावेळी स्पर्धक कलाकारांनी एकापेक्षा एक धम्माल १५ विनोदी स्क्रीप्टस्चे सादरीकरण केले. तब्बल सहा तासांच्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट केले. यावेळी प्रायोजकांकडून सर्वांना सोने खरेदीवर हमखास सवलत कुपनासह खास उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसुद्धा घेतला. दहा भाग्यवान विजेत्यांना सोन्याची कर्णफुले दिली. संजय मोहिते यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार गोरूले व अभिजित सोकांडे यांनी सूत्रसंचालन केले. राजश्री खटावकर यांनी आभार मानले. परीक्षक म्हणून अभिनेते नयन जाधव-रेवडेकर व स्वप्निल राजशेखर यांनी काम पाहिले.
बाळासाहेब कलशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.जयेश कदम, सुभाष भारती, विवेक रणवरे, दत्तात्रय मेडशिंगे, डॉ. प्रवीण कोडोलीकर, राहुल माने आदी उपस्थित होते.