सांगलीच्या पाणी योजना पंतप्रधान सिंंचन योजनेत

By Admin | Published: May 14, 2016 12:48 AM2016-05-14T00:48:33+5:302016-05-14T00:48:33+5:30

संजय पाटील : सांगली-कोल्हापूर मार्ग प्राधिकरणाकडे वर्ग

Sangli's water scheme under Prime Minister's irrigation scheme | सांगलीच्या पाणी योजना पंतप्रधान सिंंचन योजनेत

सांगलीच्या पाणी योजना पंतप्रधान सिंंचन योजनेत

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला लाभदायी ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ योजनांचा वेगवर्धित सिंचन कार्यक्रम (एआयबीपी) योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनांची १८२ कोटींची थकबाकी त्वरित देण्याची मागणी केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांकडे करण्यात आली असून, या दोन्ही योजनांचा आता पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती खा. संजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, टेंभू योजनेचाही यात समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
खा. पाटील यांनी सांगितले की, निधीअभावी जिल्ह्यातील सर्वच सिंचन योजनांची कामे रखडली आहेत. ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान सिंचन योजनेत जिल्ह्यातील ताकारी व म्हैसाळ योजनेचा समावेश झाल्याने या योजनेच्या कामांना गती मिळणार आहे. टेंभू योजनेचाही यात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सांगली-कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाबाबत खा. पाटील यांनी सांगितले की, केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या बैठकीत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. खा. राजू शेट्टी यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील ४१ किलोमीटरचा सांगली-कोल्हापूर रस्ता त्यात समाविष्ट नाही. सध्या या रस्त्याचे काम राज्य सरकार ‘बीओटी’तून करत आहे. मात्र, त्याच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत. अजूनही १४ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही, तोपर्यंतच टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून त्याच्या निकषानुसार काम करावे, अशी मागणी केली होती.
ती मागणी मान्य झाली असून सुप्रिम इन्फ्रा कंपनीस १० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत कंपनीने काम पूर्ण न केल्यास हा रस्ता प्राधिकरणाकडे वर्ग होणार आहे.
अपूर्ण काम : सुप्रिमला १० जूनपर्यंत मुदत
सांगली-कोल्हापूर मार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामाबाबत वाहनधारकांतून तक्रारी येत आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट झाले असतानाही या मार्गावर टोलची आकारणी सुरु करण्याचा डाव कंपनीने आखला आहे. त्यास विरोध असून सुप्रिम इन्फ्रा कंपनीला रस्त्याचे राहिलेले काम १० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sangli's water scheme under Prime Minister's irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.