सांगलीच्या दूषित पाण्याचा शिरोळ तालुक्याला फटका, पंचगंगेपाठोपाठ कृष्णा नदीही प्रदूषित : भाजीपाल्यांवरील कीटकनाशके, औषधांमुळेही आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:43 PM2018-01-19T22:43:16+5:302018-01-19T22:43:54+5:30
बुबनाळ : पंचगंगा नदी पाठोपाठ आता कृष्णा नदीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. विशेषकरून सांगली महापालिकेचे कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात जात आहे.
अजित चंपुणावर ।
बुबनाळ : पंचगंगा नदी पाठोपाठ आता कृष्णा नदीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. विशेषकरून सांगली महापालिकेचे कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दूषित पाणी, भाजीपाल्यावर फवारले जाणारी कीटकनाशके, वेगवेगळ्या प्रकारची औषधे यास कारणीभूत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
कृष्णा नदी दूषित करणाºया सांगली महापालिकेसह इतर घटकांवर कारवाई करावी व या नदीकाठच्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता आलासच्या जि. प. सदस्या परवीन पटेल व सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल,
हरिपूर येथील अरविंद तांबवेकर यांनी प्रदूषित झालेली कृष्णा नदीस्वच्छ करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेऊन जनआंदोलन सुरू केले आहे. सांगली महापालिका व अन्य घटकांनी कृष्णेत सोडले जाणारे दूषित सांडपाणी प्रक्रिया करून न सोडल्यास हरित लवाद व मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या काळात सांगलीतील शेरीनाला, हरिपूरजवळ लोखंडी पूलनाला यासारख्या अनेक लहान-मोठ्या नाल्यांतून प्रक्रिया न केलेले लाखो लिटर दूषित सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. सांगलीसह शिरोळ तालुक्यातील नदीकाठी वसलेल्या गावाला हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे.
अधिक माहिती घेतली असता सांगली महापालिकेचे प्रक्रिया न केलेले पाच कोटी ६० लाख लिटर पाणी दररोज नदीत मिसळत असल्याची माहिती पुढे आली आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे कामही रखडल्याचे समजते. या दूषित पाण्याची सांगलीकरांना थेट झळ बसत नाही. मात्र, सांगली जिल्ह्यातील हरिपूर, अंकली, म्हैसाळसह शिरोळ तालुक्यातील उदगाव, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड, चिंचवाड, शिरोळ, हसूर, शिरटी, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास, राजापूर, बस्तवाड, अकिवाट, खिद्रापूर, आदी गावांना फटका बसला आहे.
अगोदरच पंचगंगा नदी पूर्णत: दूषित होऊन त्याचे गंभीर परिणाम तालुक्याला भोगावे लागत आहे. यातच कृष्णा नदीही प्रदूषित होत चालल्याने भविष्यात योग्य उपाययोजना न झाल्यास शिरोळ तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, परवीन पटेल, दादेपाशा पटेल, अरविंद तांबवेकर यांनी हरिपूर येथील संगमापासून ते सांगली बंधाºयापर्यंत पाहणी केली असता सांगली महापालिकेचे दूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच कृष्णा नदीत मिसळते हे निदर्शनास आले.
सांगली महापालिका दूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडत असल्यामुळे याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. याबाबत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा नदीकाठावरील दूषित पाणी मिळत असलेल्या गावांतील नागरिकांना एकत्रित करून मोठे जनआंदोलन उभारणार आहोत.
- परवीन पटेल, जि. प. सदस्या, आलास
आंदोलने करूनही सांगली महापालिका कोणतेही सहकार्य करीत नाही. प्रशासन, पदाधिकारी हे मात्र लोकप्रतिनिधींकडून आंदोलन थांबविण्यास भाग पाडतात. हे दूषित पाणी धुळगावच्या प्रकल्पात सोडून, शुद्ध करून कृष्णा नदीमध्ये सोडणार असल्याचे गेल्या चार वर्षांपासून सांगितले जात आहे. याप्रश्नी जनहित याचिका दाखल करणार आहोत.
- अरविंद तांबवेकर, हरिपूर