‘सॅनिटरी नॅपकीन’प्रश्नी दादांचा यू टर्न

By admin | Published: August 4, 2015 12:42 AM2015-08-04T00:42:10+5:302015-08-04T00:42:10+5:30

उपक्रमासमोर प्रश्नचिन्ह : निधी मिळण्यात अडचण; जूनचा मुहूर्त टळला

'Sanitary napkin' Questions | ‘सॅनिटरी नॅपकीन’प्रश्नी दादांचा यू टर्न

‘सॅनिटरी नॅपकीन’प्रश्नी दादांचा यू टर्न

Next


उपक्रमासमोर प्रश्नचिन्ह : निधी मिळण्यात अडचण; जूनचा मुहूर्त टळला
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून पुरेसा निधी देण्यासंबंधी ‘यू टर्न’ घेतल्यामुळे जिल्ह्यातील ५० हजार विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकीन’ वाटपाचा जून महिन्याचा मुहूर्त टळला आहे. परिणामी, नवोपक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वीच निधीचे विघ्न सतावत आहे. यामुळे राज्यातील या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जिल्ह्यातील ९१९ शाळांतील एक लाख ११ हजार ३०८ विद्यार्थिनींशी संवाद साधून सर्व्हे केला. यामध्ये ५१ टक्के मुली मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकीन वापरत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थिनींना सवय लागावी, यासाठी एक वर्षभर सॅनिटरी नॅपकीन देण्याचा प्रस्ताव तयार केला. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून सव्वा दोन कोटींची मागणी केली. २२ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत १२ ते १८ वयोगटांतील सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्यासाठी वार्षिक आराखड्यात तरतूद करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. ती पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ मान्य केली. एवढेच नाही, तर त्याचे सर्वेक्षण करणे, सर्व शाळांमध्ये समन्वय साधून सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्यावर सोपविली. पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहितीही दिली. यास चांगली प्रसिद्धीही मिळाली होती.
या उपक्रमासाठी नियोजन समितीमधून ३५ लाख देण्यात आले. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांची बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर या उपक्रमासाठी निधी मिळण्याला कात्री लागण्यास सुरुवात झाली. दोन ते तीन महिन्यांसाठीच नॅपकिन्स द्यावेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यासाठीही सुमारे एक कोटीची आवश्यकता आहे. परंतु, नियोजन समितीमधून ७० लाख देऊन उर्वरित रक्कम देण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे जिल्हा परिषद स्वनिधीतून १४ लाख घालून ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान, वर्षभर नॅपकिन देण्यासाठी आवश्यक निधी न मिळाल्याने अडचण निर्माण झाली आहे. निधीची तरतूद करण्यातच जून उजाडला. यामुळे जून महिन्यात नॅपकिन वाटपाचा मुहूर्त टळला आहे. जुलै महिनाही संपला. आता आॅगस्ट सुरू झाला आहे. अजूनही कधीपासून नॅपकिन्स वाटण्यात येणार, याचे नियोजन नाही.

सॅनिटरी नॅपकिनच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी मिळाल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- अविनाश सुभेदार,
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी.

सॅनिटरी नॅपकिनसाठी आवश्यक निधीपैकी निम्मे पैसे जिल्हा परिषदेला दिले आहे. उर्वरित पैसे देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी देण्याचे आश्वासन दिले आहे. निधी मिळण्यात अडचणी येणार नाहीत.
- धनंजय महाडिक, खासदार

Web Title: 'Sanitary napkin' Questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.