महिला कैद्यांना कारागृहातच सॅनिटरी नॅपकिन-महिला आयोग : कारागृहातील सोयीसुविधांची होणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:36 AM2018-06-20T00:36:57+5:302018-06-20T00:36:57+5:30
भायखळा-मुंबई येथील कारागृहामधील महिला कैदी मंजुळा शेट्टी हिच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची पाहणी महिला आयोगाच्यावतीने सुरू आहे.
एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : भायखळा-मुंबई येथील कारागृहामधील महिला कैदी मंजुळा शेट्टी हिच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची व्यवस्था कशा प्रकारे आहे, याची पाहणी महिला आयोगाच्यावतीने सुरू आहे. आयोगाच्यावतीने राज्यातील सर्व कारागृहात महिला कैद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन आता कारागृहातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी कारागृहाला अत्याधुनिक मशीन दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंबा मध्यवर्ती कारागृहाची महिला आयोगाच्या अंजली काकडे २५ जूनला पाहणी करणार आहेत.
राज्यात कोल्हापूरसह येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणा, आर्थर रोड, भायखळा (मुंबई), औरंगाबाद, अमरावती, आदी नऊ ठिकाणी मध्यवर्ती कारागृहे आहेत. प्रत्येक कारागृहात ५० ते १५० महिला कैद्यांची संख्या आहे. भायखळा कारागृहात महिला कैदी मंजुळा शेट्टी हिचा मारहाणीत मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेची महिला आयोगाने दखल घेत राज्यातील कारागृहांची पाहणी सुरू केली आहे. महिला कैद्यांच्या सुरक्षेसाठी कारागृहात कोणत्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत, याची चौकशी केली जात आहे.
दाऊद, अरुण गवळी, आदी अंडरवर्ल्ड टोळ्यांमधील गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत शक्षा झालेले १६०० कैदी कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांमध्ये ६३ महिला कैदी आहेत. पुरुष आणि महिला कैद्यांमध्ये हाणामारीचे प्रकार वरचेवर घडत असतात. सुमारे ३२ एकरांमध्ये हे कारागृह वसलेले आहे. कैद्यांना ठेवण्यासाठी या ठिकाणी ११ बरॅक आहेत. या कारागृहाची पाहणी २५ जूनला महिला आयोगाच्या अंजली काकडे करणार आहेत. कारागृह अधीक्षकांसह कर्मचारी व कैद्यांशी त्या संवाद साधणार आहेत. कारागृहामध्ये महिला कैदी सुरक्षित आहेत काय, येथील पुरुष कैदी त्यांचा सन्मान ठेवतात काय, त्यांची स्वच्छतागृहे नीटनेटकी आहेत काय, परिसरात मोबाईल जॅमर आहे का? कारागृहाच्या सभोवती सुरक्षा भिंत मजबूत आहे का, बाहेरून वस्तू कारागृहात कशा पद्धतीने येऊ शकतात. त्यासाठी कोणती गुप्तहेर यंत्रणा कार्यरत आहे? अशा विविध स्तरांवर कारागृहाची चाचपणी करण्यात येणार आहे. कारागृहामध्ये विविध वस्तू व खाद्यपदार्थ बनविले जातात, तेथील कारखान्याची पाहणी व कारागिरांशी संवाद साधणार आहेत. येथील जेवण विभागाचीही पाहणी केली जाणार आहे. सद्य:स्थितीत एकूण कैद्यांची संख्या, पॅरोलवर गेलेले कैदी आणि कारागृहातील मूलभूत सुविधांची माहिती घेतली जाणार आहे. त्याच धर्तीवर बिंदू चौक कारागृहाचीही तपासणी केली जाणार आहे.
कैद्यांचे शिस्तीचे नियोजन
कारागृहाची तपासणी असल्याने प्रत्येक बराकीमध्ये कैद्यांनी शिस्तबद्ध नियोजन केले आहे. महिला आयोगाच्या अंजली काकडे यांचा आतमध्ये प्रवेश होताच ‘जय हिंद, एक साथ नमस्ते’ असे बोलून कैदी त्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी कैद्यांचे पांघरूण, जेवणाची भांडी, अंगातील कुर्ता-साडी सगळे काही नियोजन आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी कैद्यांसह अधिकारी परिश्रम घेत आहेत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाची पाहणी करण्यासाठी महिला आयोगाच्या अंजली काकडे येत आहेत. महिला कैद्यांच्या सुरक्षेसंबंधी त्यांची भेट आहे.
- शरद शेळके, कारागृह अधीक्षक