स्वच्छता मोहीम : ‘नॉट आऊट शंभरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:02+5:302021-03-15T04:22:02+5:30
कोल्हापूर : महापालिका, सामाजिक संघटनांकडून अखंडपणे दर रविवारी होणारी स्वच्छता मोहीम ‘शंभरी’च्या उंबरठ्यावर आहे. या माध्यमातून आतापर्यंत १५० टन ...
कोल्हापूर : महापालिका, सामाजिक संघटनांकडून अखंडपणे दर रविवारी होणारी स्वच्छता मोहीम ‘शंभरी’च्या उंबरठ्यावर आहे. या माध्यमातून आतापर्यंत १५० टन कचरा उठाव झाला आहे. २८ मार्चला १०० वी स्वच्छता मोहीम होणार असून, ती ऐतिहासिक ठरणारी आहे. यावेळी ८१ प्रभागांत एकाच वेळी स्वच्छता होणार असून, महापालिकेचे तब्बल ३५०० कर्मचारी सहभागी होणार आहेत.
सुटीचा दिवस म्हटले की, निवांत उठणे, कुटुंबासोबत उद्यानात जाणे अशी अनेक कामे केली जातात. कोल्हापूर महापालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी आणि काही सामाजिक संघटना याला अपवाद आहेत. सुटी असूनही ते दर रविवारी सकाळी न चुकता महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. रविवारी (दि. १४) ९८ वी स्वच्छता मोहीम झाली. दोन आठवड्याने म्हणजेच २८ मार्चला १०० वी स्वच्छता मोहीम होत आहे. ही ‘शतकी’ मोहीम भव्य प्रमाणात करण्याचे नियोजन सुरू आहे.
चौकट
डॉ. कलशेट्टी स्वच्छता मोहिमेचे जनक
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी २८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाले. त्यांनी रविवारी कधीच सुटी घेतली नाही. पहिल्याच आठवड्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही त्यांची परंपरा सुरूच ठेवली. यामध्ये सामाजिक संघटनांचाही तितकाचा मोठा वाटा आहे. यामुळेच आता ती शंभरीकडे वाटचाल करीत आहे.
प्रतिक्रिया
महापालिका आणि कोल्हापूरकरांनी स्वच्छता मोहीम सातत्यपूर्वक ठेवली ही चांगली गोष्ट आहे. यामुळे स्वच्छतेबाबत जनजागृत्ती होते. शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी मदत होते. येथून पुढेही मोहीम सुरू ठेवावी.
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी
प्रतिक्रिया
महापालिकेकडून रविवारी २८ मार्चला १०० वी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी प्रत्येक प्रभागात स्वच्छता केली जाणार असून, महापालिकेचे सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी हाेणार आहेत. याचबरोबर प्रत्येक प्रभागातील ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे.
जयंत पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका
चौकट
मोहिमेतून एकूण कचरा उठाव : १५० टन
प्लास्टिक कचरा : ५० टन
वृक्षारोपण : सुमारे २०००
वृक्षांची देखभाल : ५००
चौकट
मोहिमेची वैशिष्ट्ये
सलग १०० रविवार स्वच्छता मोहीम राबविणारी एकमेव महापालिका
महापुरात नदी, नाला परिसरात धोका झाला कमी
स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृत्ती
शहर स्वच्छ राहण्यास मदत
दुर्लक्षित परिसराची स्वच्छता
चौकट
कोल्हापूरकरांच्या जिद्दीला सलाम
महापालिका कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक संघटना स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात. शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो. स्वच्छतादूत अमित देशपांडे, वृक्षप्रेमी संस्था, स्वरा फाउंडेशन न चुकता मोहिमेला हजर राहतात.