Kolhapur: आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले; घर, शेती सांभाळत बारावी परीक्षेत संजना हिने यश मिळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:13 PM2024-05-22T12:13:17+5:302024-05-22T12:15:12+5:30
घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रामाणिक कष्ट
कोल्हापूर : भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजना धनाजी गोळे (रा. केर्ले, ता. करवीर) हिने वाणिज्य शाखेतून ८३.५० टक्के गुण मिळवत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले असताना घर आणि शेती सांभाळणाऱ्या आईला मदत करत संजना हिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता यशाला गवसणी घातली.
केर्ले येथील संजना गोळे हिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर ते अंथरुणाला खिळून आहेत. आई शेती सांभाळून संसाराचा गाडा हाकते. घरची बेताची परिस्थिती आणि वडिलांचे आजारपण लक्षात घेऊन आईला शेतीत आणि घरात मदत करून संजना हिने १२ वीचा अभ्यास केला. गणिताची आवड असल्यामुळे तिने वाणिज्य शाखा निवडली होती.
घरात कोणीही उच्चशिक्षित नसताना शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रामाणिक कष्ट आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन, या बळावर तिने १२ वीच्या परीक्षेत ८३.५० टक्के गुण मिळवत मेन राजाराम ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. पोलिस दलात करिअर करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. वर्गशिक्षक राहुल देशमुख यांच्यासह विषय शिक्षक ए. एम. धुमाळ, ए. एस. पाटील आणि प्राचार्य व्ही. बी. डोणे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.