संजय भोसलेंसह आणखी चार कर्मचारी घोटाळ्यात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:27+5:302021-08-13T04:27:27+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा घोटाळ्यात कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा तत्कालीन करनिर्धारक संजय भोसले यांच्यासह दिलीप कोळी, शशिकांत पाटील, बापू ...
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा घोटाळ्यात कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा तत्कालीन करनिर्धारक संजय भोसले यांच्यासह दिलीप कोळी, शशिकांत पाटील, बापू माने, अशा चौघांचाही समावेश असल्याचे खातेअंतर्गत झालेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या चौघांवरदेखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.
महानगरपालिकेत सुरू असलेल्या घरफाळा घोटाळ्यात या आधी दिवाकर कारंडे, नितीन नंदवाळकर, अनिरुद्ध शेटे व विजय खातू यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना सेवेतून निलंबितसुद्धा करण्यात आले आहे. आता या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली आहे. तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले आता स्वत:च आरोपी होण्याची, तसेच त्यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी चौकशी केलेल्या घोटाळ्यातील चौदा प्रकरणांपैकी आठ प्रकरणांत काही नवी माहिती समोर आली आहे. ही माहिती माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविली. ती माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत शेटे यांनी पत्रकारांना दिली.
भूपाल शेटे यांनी सांगितले की, घरफाळा घोटाळाप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी महापालिका प्रशासनाकडे काही माहिती मागितली होती. त्यामध्ये संगणकामध्ये चुकीच्या नोंदी कोणी व कशा प्रकारे केल्या, करारपत्राचा चुकीचा अंमल कोणी व कशा प्रकारे केला, प्रत्यक्षात नुकसान झालेली रक्कम आणि जबाबदार व्यक्ती यांच्या माहितीचा समावेश आहे. त्यानुसार सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी माहिती घेतली असता त्यामध्ये संजय भोसले, दिलीप कोळी, शशिकांत पाटील व बापू माने या चौघांकडूनही महापालिकेकडून नुकसान झाले असल्याचे समोर आले. आधीच्या चौकशीत ३ कोटी १४ लाख ६१ हजार ३८ रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. मात्र, आता नुकसानीची ही रक्कम कमी होऊन एक कोटी ४८ लाख ०९ हजार ७७३ रुपयांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.
फिर्यादीच होणार आरोपी?
गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात संजय भोसले फिर्यादी आहेत. आता त्यांचेही नाव घोटाळ्यात जोडले गेले असल्यामुळे त्यांना आरोपी केले जाणार असल्याचे भूपाल शेटे यांनी सांगितले. भोसले यांनी आपला स्वत:चा, तसेच अन्य काही जणांचा बचाव करण्याकरिता दिवाकर कारंडे, नितीन नंदवाळकर, अनिरुद्ध शेटे, विजय खातू या चौघांवर जबाबदाऱ्या टाकून गुन्हा दाखल केला. प्रशासनला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असा आरोपही शेटे यांनी केला.
पाच प्रकरणांत संजय भोसले दोषी -
घरफाळा घोटाळ्यातील चौदापैकी आठ प्रकरणांची चौकशी झाली. त्यातील पाच प्रकरणांत दिवाकर कारंडेसह संजय भोसले दोषी आहेत; परंतु त्यांनी आपले नाव पद्धतशीरपणे बाजूला काढले होते. अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, असा आरोप शेटे यांनी केला. अनिरुद्ध शेटे यांस ज्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, त्या प्रकरणात नुकसानच झालेले नसून, अनिरुद्ध शेटे निर्दोष असल्याचे सांगण्यात आले.