खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे संजय भोसले यांनी बढती मिळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:21+5:302021-07-07T04:28:21+5:30
संजय भोसले केएमटीकडे क्लार्क म्हणून नोकरीस लागले; मात्र त्यावेळी त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून खोटी प्रमाणपत्रे सादर केली. त्यानंतर त्यांना ...
संजय भोसले केएमटीकडे क्लार्क म्हणून नोकरीस लागले; मात्र त्यावेळी त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून खोटी प्रमाणपत्रे सादर केली. त्यानंतर त्यांना अकाउंटंट व अधीक्षक म्हणून प्रमोशन देताना तत्कालिन उपायुक्त गणेश देशमुख यांनी मेहरबानी केली. भोसले यांनी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन प्रभारी सहायक आयुक्त म्हणून निवड करून घेतली. त्यानंतर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक, करनिर्धारक व संग्राहक, कामगार अधिकारी, इस्टेट अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी तर सध्या अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून महत्त्वाच्या पदावर काम केले. या सर्व निवडी बेकायदेशीर असून, त्यांनी घेतलेला पगार, आर्थिक लाभ एक कोटीच्यावर तर आठ वर्षे बेकायदेशीर गाडीचा वापर व चालकाचा पगार असे ५० लाख रुपये भोसले यांच्याकडून वसूल करावेत, तत्कालिन उपायुक्त गणेश देशमुख यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी शेटे यांनी केली.
भोसले यांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल झाली होती, त्याचा निकाल त्यांच्या विरोधात गेला. या निकालाच्या विरोधात भोसले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही भोसले यांच्या विरोधातच निकाल दिला गेला. या निकालाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने केलेली नाही. प्रशासक डॉ. बलकवडे यांना आपण याबाबतची सर्व कागदपत्रे, पुरावे, न्यायालयाच्या निकालाच्या प्रति दिल्या आहेत. त्यांनी तत्काळ भोसले यांना बडतर्फ करावे, अन्यथा मला स्वत: न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा शेटे यांनी दिला.