कागल विधानसभेसाठी संजय घाटगेच
By admin | Published: May 25, 2014 12:59 AM2014-05-25T00:59:57+5:302014-05-25T01:00:40+5:30
संजय मंडलिक यांची माहिती : ‘महायुती’चा लवकरच व्यापक मेळावा
कोल्हापूर : येत्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार संजय घाटगेच रिंगणात राहणार आहेत. यापूर्वीच हा निर्णय झाला असल्याचे ‘महायुती’चे नेते प्रा. संजय मंडलिक यांनी आज, शनिवारी स्पष्ट केले. यामुळे संजय मंडलिक आता ‘कागल’मधून विधानसभा निवडणूक लढविणार या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला. चुरशीची लढत होऊन लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून निसटता पराभव झालेले शिवसेनेचे उमेदवार प्रा. मंडलिक यांची पुढील दिशा ही शिवसेना बळकटीबरोबरच येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणे, अशी राहणार आहे. प्रा. मंडलिक यांच्या पराभवानंतर ते पुन्हा कागलमधून विधानसभेला उभे राहणार आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कागलमधीलच एक गट तशी हवा निर्माण करून लोकांमध्ये कसा संभ्रम निर्माण होईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. त्यामुळे याबाबत थेट प्रा. मंडलिक यांना विचारणा केली असता त्यांनी महायुतीतर्फे शिवसेनेचे संजय घाटगे हेच कागलमधून उमेदवार असतील, असे स्पष्टपणे सांगितले. यापूर्वी घाटगे हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढवूनच पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यांना विधानसभेचा पहिला गुलाल हा शिवसेनेनेच दिला आहे. प्रा. मंडलिक म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासाबाबत समाधानी आहे. इथून पुढे शिवसैनिक या नात्याने कार्यरत राहणार आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे.’ ते म्हणाले, आपल्या पराभवाबाबत आपण कोणावरही आरोप केलेले नाहीत. सर्वांनी आपल्याला चांगले सहकार्य केले आहे. इथून पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत महायुतीचा लवकरच कोल्हापुरात भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मतदारसंघात तालुकानिहाय आभार दौरा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)