Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:19 IST2025-04-16T13:16:08+5:302025-04-16T13:19:15+5:30
जे एस शेख कागल : तालुक्याच्या राजकारणात चिवट आणि लढाऊ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून अनेक वर्षे मातब्बराबरोबर राजकीय संघर्ष ...

Kolhapur Politics: भाजप प्रवेशाने संजय घाटगे गटाला मिळणार उभारी, समरजीत घाटगे यांची गोची
जे एस शेख
कागल : तालुक्याच्या राजकारणात चिवट आणि लढाऊ कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून अनेक वर्षे मातब्बराबरोबर राजकीय संघर्ष करणारे माजी आमदार संजय घाटगे यांनी आता तडजोडीच्या राजकारणाचे पुढील पाऊल टाकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुळातच गटातटाच्या राजकारणास महत्त्व असलेल्या कागल तालुक्यात या प्रवेशाने फार काही समीकरणे बदलणार नाहीत. मात्र, संजय घाटगे गटाला देशात व राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाचा मोठा फायदा होणार आहे.
तालुक्यातील मुश्रीफ गट ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) मंडलिक गट ( शिवसेना- शिंदे गट) हे सत्तेचे वाटेकरी असून आता यात संजय घाटगे गटाची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात संजय घाटगे व अंबरिष घाटगे सर्वांत पुढे होते. त्यामुळे मुश्रीफांना मिळणाऱ्या सत्तेचा लाभ त्यांना होत होताच पण आता थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता येणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कमळ फुलवण्याची संधी
प्रतिकूल राजकीय परीस्थितीत संजय घाटगे यांनी आपला राजकीय गट टिकवून ठेवला आहे. त्यांचे पुत्र अंबरीष घाटगे हे तरुणांच्या मध्ये लोकप्रिय आहेत. अन्नपुर्णा साखर कारखाना, गोकुळ व जिल्हा बॅक संचालक ही पदे आहेत. त्यामुळे भाजपाला कागल विधानसभा मतदारसंघात लहान मोठ्या निवडणुकीत कमळ फुलविण्याची संधी लाभणार आहे. हसन मुश्रीफांना नैसर्गिक युतीचा फायदा होत असतांना संजय मंडलिकांच्यावर अदृष्य दबाव येणार आहे.
राजे गटाची गोची
महायुतीत अजित पवार गट सहभागी झाल्यापासून समरजीत घाटगे यांची राजकीय गोची सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध जुळले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटातील त्यांचा प्रवेश राज्यभर चर्चेत आल्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास खडतर बनला आणि आता संजय घाटगेंनी आधीच सीट धरली आहे. अधूनमधून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशी चर्चा होते. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे काम समरजीत घाटगेंना करावे लागणार आहे.