Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांना संजय घाटगे गटाचा पाठिंबा, व्हनाळीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय
By विश्वास पाटील | Published: March 26, 2024 01:40 PM2024-03-26T13:40:46+5:302024-03-26T13:40:55+5:30
'शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करण्याचा निर्धार'
कोल्हापूर : सध्याच्या बदललेल्या राजकीय समिकरणांचा आणि परिस्थितीचा विचार करता कागलचे माजी आमदार संजय घाटगे गटाचा राजकीय विरोधक ठरला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू आणि शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करू असा निर्धार व्हनाळी (ता.कागल) येथील संजय घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज, मंगळवारी घेण्यात आला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थावरून बोलताना संजय घाटगे म्हणाले, आम्ही राजकारणात कोणावर विनाकारण पलटवार केले नाहीत. आणि कोणापुढेही गुडघेदेखील टेकले नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात सकारात्मक राजकारणाची नांदी होईल.
..त्यामुळे खंत नाही
मला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतू पक्षप्रमुख ठाकरे यांनी शाहूंच्या गादीचा मान राखण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्याची खंत नाही. निष्ठावंत कार्यकर्तेच आमचे भागभांडवल आहेत. त्यामुळे नेटाने कामाला लागू.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, आमचा राजकिय शत्रू कोण हे आता जवळजवळ ठरलेलं आहे. त्यामुळे ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू. जिल्हाचा खासदार ठरविण्याची ताकद संजय घाटगे गटात आहे. ती ताकद या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ.
यावेळी विजय जाधव, वैभव आडके, आनंदा भिऊंगडे, दिलीप चौगले, बाबूराव शेवाळे, विलास पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, युवराज कोईगडे, अशोक पाटील, मुकुंद बोडके, मल्हारी पाटील, के.के.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास दिनकर पाटील, आनंदा साठे, ए.वाय पाटील, रणजित मुडूकशिवाले, सिद्रमा गंगाधरे, एम.बी.पाटील, धनाजी गोधडे, विलास पोवार, शिवगोंड पाटील, आल्लाबक्ष शहाणेदिवाण यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.