विमान चालविण्याच्या परीक्षेत संजय घोडावत उत्तीर्ण : भारतातील पहिले उद्योगपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:06 AM2018-02-23T01:06:27+5:302018-02-23T01:11:16+5:30
कोल्हापूर : ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजापर्यंत झेप घेण्याची जिद्द असावी...’ या कवितेला साजेल अशी कामगिरी करून दाखविणारे
कोल्हापूर : ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजापर्यंत झेप घेण्याची जिद्द असावी...’ या कवितेला साजेल अशी कामगिरी करून दाखविणारे, आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरविणारे प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत हे नुकतेच ‘फिक्स्ड विंग एअरोप्लेन’ या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. स्वत:चे हेलिकॉप्टर आणि विमान चालविणारे भारतातील ते पहिले उद्योगपती आहेत.
उद्योगपती घोडावत हे नोव्हेंबर २०१६ मध्ये हेलिकॉप्टर प्रायव्हेट पायलट लायसेन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. यापूर्वी त्यांनी चार वेळा ही परीक्षा दिली होती; परंतु त्यांना त्यात अपयश आले होते. त्याने खचून न जाता त्यांनी नोव्हेंबर २०१६ च्या पायलट परीक्षेत देदीप्यमान यश मिळविले. यानंतर सन २०१७ मध्ये हेलिकॉप्टरचे आंतरराष्ट्रीय पायलट लायसेन्स ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी ते अमेरिकेतील लॉस एंजिल्सला गेले. तिथे ट्रेनिंग कालावधीमध्ये ५५ तासांची हवाई सफर यशस्वीरीत्या पूर्ण करून फ्लाइंग टेस्टमध्ये त्यांनी ८३ टक्के गुण संपादन केले. यानंतर त्यांनी सन २०१८ मध्ये ५५ तासांची हवाई सफर व विमान पायलट ट्रेनिंग पूर्ण करून पायलट परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले. या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरांवरून अभिनंदन होत आहे.
सर्वजण प्रत्येक बाबतीत ‘स्काय इज द लिमिट’ असे म्हणतात; परंतु उद्योगपती घोडावत यांच्या मते ‘स्काय इज नॉट द लिमिट; इट्स बिगिनिंग.’ म्हणजे खऱ्या अर्थाने ती सुरुवात आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी गगनात भरारी घेणारे उद्योगपती घोडावत या कामगिरीने तरुणांचे आयडॉल बनले आहेत. ज्या वयात लोक सेवानिवृत्ती पत्करतात, त्या वयात उद्योगपती घोडावत वैमानिक बनले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावत जाणारा पाहून आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणा व ऊर्जा मिळेल यात तीळमात्र शंका नाही. औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व कॉर्पोरेट क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कित्येक सेवाभावी संस्थांनी व संघटनांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. एकदा संकल्प केला तर त्याची परिपूर्ती केल्याशिवाय ते थांबत नाहीत, हे त्यांच्या आजवरच्या कार्यातून दिसून येते.
शिकण्याची जिद्द जोपासा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सतत काहीतरी शिकण्याची जिद्द जोपासायला हवी व ती गोष्ट सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. यशस्वी होण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही, हेच माझ्या यशाचे रहस्य आहे, अशी प्रतिक्रिया उद्योगपती संजय घोडावत यांनी व्यक्त केली.
नेहमीच मदतीचा हात
कार्यकर्तृत्वाने व अनेक गौरवांनी सन्मानित होऊनसुद्धा ते आपल्या जमिनीशी नाळ जोडून आहेत. मातीशी प्रेम असल्यामुळेच त्यांनी कोल्हापूर व जयसिंगपूर या परिसरांत उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून दहा हजारांहून अधिक लोकांना रोजगार पुरविला आहे.
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज संजय घोडावत विद्यापीठामध्ये १५ हजारांहून अधिक विद्यार्र्थी आपले भविष्य घडवीत आहेत. सामाजिक बांधीलकीची भावना हृदयामध्ये जोपासणाºया व देशसेवेचे व्रत हाती घेतलेल्या उद्योगपती घोडावत यांनी आजवर दीनदुबळ्या लोकांना, अनाथालयांना, शहीद जवानांना, आरोग्य केंद्रांना, अंध, अपंग शाळांना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे.