LokSabha 2024: मंडलिक, माने यांना पाडण्याचा निर्धार; कोल्हापुरात उद्धवसेनेच्या निष्ठावंताच्या मेळाव्यात गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:16 PM2024-04-04T17:16:35+5:302024-04-04T17:19:30+5:30
मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार
कोल्हापूर : मतदारांशी प्रतारणा आणि मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना पराभूत करण्याचा निर्धार बुधवारी उद्धसेनेच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात करण्यात आला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांनी ही गर्जना केली. यावेळी राज्यात सर्वाधिक मतांनी शाहू छत्रपती यांना निवडून आणण्याचा निर्णयही यावेळी झाला. शाहू सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा झाला. उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, प्रबोधनकार कै. बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. आजही ते कायम आहेत. सन १९९८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. पण, मनोहर जोशी यांच्या शब्दामुळे विक्रमसिंह घाटगे यांना उमेदवारी मिळाली होती. आता पुन्हा मला रयत आणि जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी मिळाली आहे. देशात सध्या हुकूमशाही आहे. लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे.
दुधवडकर म्हणाले, शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या विरोधात उमेदवार बेईमान, गद्दार, बेंटेक्सवाले आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्क्याने पाडा. कोल्हापुरातून शाहू छत्रपती आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना खासदार करण्यासाठी उद्धवसेनेच्या सैनिकांनी स्वत: उमेदवार आहेत असे समजून काम करावे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी आणि रात्रीचा दिवस करावा.
उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, संजय मंडलिक यांची अवस्था कोण होतास तू काय झालास तू, वेड्या वाया कसा गेलास तू या गाण्याप्रमाणे झाली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारी न बदलल्याने गद्दारी केलेले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पाडण्याची संधी मिळाली आहे.
माजी आमदार संजय घाटगे यांनी कागलमधून शाहू छत्रपती यांना शोभेल असे मत्ताधिक्य देण्याचा विश्वास दिला. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रविकिरण इंगवले, प्रा. सुनील शिंत्रे, हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, अंबरिश घाटगे, सुनील मोदी, प्रतीज्ञा उत्तुरे यांच्यासह उद्धवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरचा एकच वाघ, शाहू महाराज..
मेळाव्याला उमेदवार शाहू छत्रपती यांचे आगमन होताच सर्व उद्धव सैनिकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. हलगी वादन आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कोल्हापूरचा एकच वाघ, शाहू महाराज, शाहू महाराज अशा घोषणांनी परिसर दणाणेन सोडला.
भाजप हटाव, देश बचाव
भाजप हटाव, देश बचाव, अबकी बार तडीपार अशी घोषणा भाषणात उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी देताच टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्यात आला. शिवसेना फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय मंडलिक यांनी बेंटेक्स सोने गेले आणि खरे सोने राहिले, असे म्हटले होते. तेच तिसऱ्या दिवशी गद्दारी करून बेंटेक्स असल्याची कबुली दिल्याचा आरोप पवार यांनी केला.
मंडलिक यांचा भाजपमध्ये अपमानच
पवार म्हणाले, शिवसेनेत असताना संजय मंडलिक यांना सन्मान मिळत होता. मातोश्रीशी गद्दारी करून गेल्यानंतर भाजप कार्यालयात त्यांचा अपमान केला. त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आणली. ठरवून त्यांच्या उमेदवारीला विरोध करायला सांगितले. मंडलिक यांना शिवसेनेत सन्मान मिळत होता आणि भाजपसोबत गेल्याने त्यांचा अपमान होत आहे. उद्धवसेना आणि भाजपमध्ये संस्काराचा हा फरक आहे.
संजय मंडलिक यांची खोक्यासाठी गद्दारी
विजय देवणे म्हणाले, सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर संजय मंडलिक यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या ओट्यात घेतले होते. मात्र, त्यांनी खोक्यासाठी ओटा फाडून गद्दारी केली. मंडलिक यांनी प्रचारात पातळी सोडली तर जशास तसे उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.