कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात, जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या डोळ्यात अश्रू; म्हणाले...
By समीर देशपांडे | Published: July 20, 2022 01:15 PM2022-07-20T13:15:04+5:302022-07-20T13:16:04+5:30
आमच्यासोबत ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे, पत्रकार परिषद घेणारे मंडलिक न सांगता तिकडे जावून मिळाले हे अजिबात सहन केले जाणार नाही.
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरातून शिवसेनेचे दोन खासदार देण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला. परंतू संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी आमचा विश्वासघात केला. तेव्हा या दोघांना २०२४ मध्ये पाडण्यासाठी राबणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. यावेळी त्यांना आपले अश्रूही रोखता आले नाहीत.
पवार म्हणाले, मंडलिक एकटे जरी आमच्याकडे राहिले असते तरी आम्ही शिवसैनिकांनी त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचा नेता म्हणून खूप मोठे केले असते. त्यांनी आता आम्हांला भेटायला याची गरज नाही. अशांना भेटण्याची गरज नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंचा आणि तमाम शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. आमच्यासोबत ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे, पत्रकार परिषद घेणारे मंडलिक न सांगता तिकडे जावून मिळाले हे अजिबात सहन केले जाणार नाही. कोल्हापूर काय आहे हे त्यांना निवडणुकीत दाखवून देवू.
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. मात्र, या दोघा खासदारांच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर या दोघांविरोधात जोरदार टीका होवू लागली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकामध्येच आता सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.