Kolhapur: संजय मंडलिक, राजू शेट्टी यांचा प्रचाराचा खर्च जास्त; प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:23 PM2024-05-06T12:23:15+5:302024-05-06T12:24:23+5:30
खर्चात तफावत आढळल्याने दोन उमेदवारांना नोटीस
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत एप्रिल अखेरपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक खर्च महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी हे खर्चात आघाडीवर आहेत. दरम्यान, निवडणूक प्रशासनाने लावलेला आणि उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आणि मंडलिक यांना नोटीस काढली आहे.
‘कोल्हापूर’मधून २३ तर ‘हातकणंगले’तून २७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसांपासून ते ३० एप्रिल अखेरपर्यंतचा खर्च निवडणूक प्रशासनाकडे दाखल केला आहे. याची पडताळणी खर्च तपासणी समितीने केली आहे. निवडणूक प्रशासनाने निश्चित केलेल्या खर्चाचे दर आणि उमेदवाराने दिलेल्या खर्चाची पडताळणी समिती करीत आहे. यामध्ये तफावत आढळल्याने मंडलिक आणि शाहू छत्रपती यांना नोटीस दिली आहे.
शाहू छत्रपती यांनी केलेला खर्च आणि प्रशासनाने लावलेल्या खर्चात ४ लाख ७८ हजार ५०० तर मंडलिक यांच्या खर्चात २१ लाख २० हजार ३९२ रुपये खर्चात तफावत आढळली आहे. स्वत:ची वाहने घेऊन प्रचार सभेला आणि प्रचार यात्रेला आलेल्या वाहनांचा खर्चही प्रशासनाने उमेदवारांवर टाकला आहे. हा खर्च उमेदवारांनी अमान्य केला आहे. म्हणून खर्चात तफावत आढळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रमुख उमेदवारांनी केलेला खर्च असा :
कोल्हापूर : शाहू छत्रपती (काँग्रेस) : ४१ लाख ४१ हजार ४८४, संजय मंडलिक (शिंदेसेना) : ५२ लाख २९ हजार ८२५, बाजीराव खाडे ( अपक्ष) : २ लाख १५ हजार ४३८.
हातकणंगले : धैर्यशील माने ( शिंदेसेना): १८ लाख ५३ हजार २६१, सत्यजित पाटील (उद्धवसेना) : २० लाख ६४ हजार ५६४, राजू शेट्टी ( स्वाभिमानी शेतकरी संघटना) : २७ लाख ४७ हजार ९५७, डी. सी. पाटील ( वंचित): ६ लाख २४ हजार २५.
सर्वांत कमी
आतापर्यंत सादर केलेल्या खर्चात कोल्हापूरमध्ये सर्वांत कमी ॲड. यश हेगडे-पाटील यांनी १३ हजार तर हातकणंगलेतून अपक्ष उमेदवार लक्ष्मण तांदळे यांनी १२ हजार ८०० रुपये इतका खर्च केला आहे.