डी.वाय.पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते; संजय पाटील यांनी व्यक्त केली भावना
By विश्वास पाटील | Published: October 22, 2022 08:42 AM2022-10-22T08:42:37+5:302022-10-22T08:43:59+5:30
डी.वाय.पाटील यांचा आज ८७ वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात
विश्वास पाटील, कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांचे गांधी घराण्याशी अनेक वर्षांचे ऋणानुबंध. दिवंगत संजय गांधी यांच्याशी तर त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. ते एकदा डी.वाय.दादांना म्हणाले होते की तुम्ही एकदिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाल..आणि दादांच्याकडे तेवढीच नक्कीच क्षमता होती..दादा शैक्षणिक क्षेत्रात काम करत राहिले, त्यातून त्यांनी जे जग निर्माण केले त्याचे आम्हांला मोठे समाधान आहे. डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.संजय पाटील आठवणींचा पट उलगडून सांगत होते. निमित्त होतं..डी.वाय.पाटील यांच्या आज, शनिवारी (दि.२२ ऑक्टोबर) होणाऱ्या ८७ व्या वाढदिवसाचे.
मी असेन, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह तीन बहिणी आमच्या सर्वांचे आयुष्य आज जे कांही आहे ते सबकुछ दादा या दोनच शब्दांत सामावलं आहे. ते होते म्हणूनच आम्ही आज हे दिवस पाहिले अशीच कृतार्थभावना या कुटुंबियांच्या मनांत आहे.
दादा आणि आई शांतादेवी यांचे कष्ट झेलले त्यांच्याच आशिर्वादामुळे आम्ही प्रगतीचा टप्पा गाठला हे खरे असले तरी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनात डी. वाय. पाटील हा जो एक ब्रॅन्ड तयार झाला, त्याचे सारे श्रेय दादांच्या दूरदृष्टीला, त्यांनी उचललेल्या अपार कष्टाला, गोरगरिबांच्याप्रती त्यांच्या मनांत असलेल्या सहानुभूतीला आहे अशा भावना संजय पाटील यांनी व्यक्त केल्या. डी.वाय. पाटील जसे शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झाले तसे ते महाराष्ट्राच्या राजकारणातही यशस्वी झाले नसते का या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले.
शैक्षणिक क्षेत्रात येण्यापूर्वी डी.वाय.पाटील राजकारणात सक्रिय होते. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील,शंकरराव चव्हाण तसेच राजारामबापू पाटील यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते..ते शिक्षण क्षेत्रात न येता राजकारणात राहिले असते तर नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. पण मागे वळून पाहताना आज आम्हांला त्याची कोणतीही खंत वाटत नाही..कारण त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे उभे केले ते देखील त्याच तोडीचे काम आहे.
ते म्हणाले, दादांनी आम्हांला दोन-तीन महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. नम्रपणे वागा..लोकांची सेवा करा, त्यांना मदत करा. ही त्यांनी घालून दिलेली वाटच आमच्या जगण्याचा मूलमंत्र बनली. दादांच्या आयुष्याची सुरुवात अत्यंत खडतर झाली. ते सात वर्षाचे असताना आई गेली. सोळा वर्षाचे असताना वडिल गेले. दादा एकटेच. अन्य बहिण-भाऊ कोणी नाहीत. परंतू त्यांच्या जगण्यात लहानपणापासूनच निडरपणा होता. भिती त्यांना माहित नाही. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आयुष्याला आकार दिला.
संजय पाटील सांगतात, मी वयाच्या २४ वर्षाचा असताना त्यांनी या शिक्षण समुहाची सुत्रे माझ्याकडे दिली. चेकवर सहीचे अधिकार दिले. त्यानंतर त्यांनी आजअखेर कधीच कोणत्याही गोष्टीचा कधीच माझ्याकडे हिशोब मागितला नाही. एवढ्या लहान वयात त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहिलो म्हणूनच आज हे सोन्याचे दिवस पाहू शकलो. नुसती संस्थात्मक प्रगतीच नव्हे तर कुटुंब म्हणूनही आम्ही एकमेकांच्या सुखदु:खाशी एकरुप झालो आहोत. दादांनी पेरलेले प्रेम पुढच्या अनेक पिढ्यांना बांधून ठेवण्याइतके नक्कीच मजबूत आहे. त्याचा आम्हांला डी.वाय.पाटील यांची मुले म्हणून नक्कीच आनंद आणि अभिमान आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"