शिवसेनेतून संजय पवार यांची हकालपट्टी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 04:21 PM2019-11-21T16:21:30+5:302019-11-21T16:25:38+5:30
विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल पक्षाकडे पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या दुर्गेश लिंग्रस व कमलाकर जगदाळे यांना पाठीशी घालून त्यांना अप्रत्यक्ष साथ देणाºया जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी एकमुख मागणी शिवसेनेच्या शहर कार्यकारीणीने गुरुवारी केली. पवारांसह संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
शाहू स्मारक भवन येथे शिवसेना शहर कार्यकारीणी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहरप्रमुख रविकिरण इंगवले होते.
शिवसेना पक्षाशी वेळोवेळी गद्दारी करणा-या आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे आदी गद्दारांना फूस लावून पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभागी करून घेणाºया जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या पक्ष निष्ठेची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर व त्यांच्यासोबत असणाºया गद्दार टोळक्यावर कारवाई करावी, अशी एकमुख मागणी या बैठकीत पदाधिका-यांनी केली.
यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, रणजीत जाधव, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, दीपक गौड, प्रकाश सरनाईक, विशाल देवकुळे आदी पदाधिका-यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
या सर्वांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात केलेल्या कामाचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना भेटून सादर करणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले. राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचार करण्याचे काम या टोळक्याने केले आहे. विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल पक्षाकडे पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण त्याच गद्दारांना पुन्हा पक्षाच्या कार्यक्रमात घेणा?्या जिल्हाप्रमुख यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित होत आहे, असा टोला इंगवले यांनी लगावला.
यावेळी जयवंत हारुगले, अंकुश निपाणीकर, गजानन भुर्के, रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुखांच्या गद्दारीची अनेक उदाहरणे
गेल्या काही वर्षात जिल्हाप्रमुख पवार यांच्या गद्दारीची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पंचायत समिती निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात तानाजी आंग्रे यांना बंडखोरी करायला लावून पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करणे. शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या अंगावर धाऊन जाण्याचा अशोभनीय प्रकार या जिल्हाप्रमुख व त्यांच्या टोळक्याने केला आहे, असा आरोप यावेळी पदाधिका-यांनी केला.