संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, अन्यथा अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही: चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:09 PM2021-02-27T17:09:53+5:302021-02-27T17:18:13+5:30
chandrakant patil Kolhapur- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
कोल्हापूर : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकारचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का केली नाही, तसेच या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न उपस्थित करून आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, या सरकारमधील मंत्र्यांवरील आणि पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबण्यात येत आहेत. धनंजय मुंडे प्रकरणात कारवाई झालेली नाही, एका मंत्र्यांच्या जावयाला ड्रग्जमध्ये पकडलं, त्यावरही कारवाई केली नाही. एका मंत्र्याने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारले, त्यावरही कारवाई केलेली नाही.
एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या भाजपच्या चित्रा वाघ यांच्या पतीची चौकशी आत्ताच का सुरू होतेय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.कार्यकर्त्यांवर, पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारच्या कितीही कारवाई केल्या तरी आम्ही घाबरणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.