संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे नव्हे तर शरद पवारांचे; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:14 PM2022-04-07T18:14:47+5:302022-04-08T14:27:09+5:30
संजय राऊत हे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीय आहे असे ते म्हणाले.
कोल्हापूर : आतापर्यंत महाविकास आघाडीच्या इतक्या नेत्यांवर कारवाई झाली. परंतू ज्येष्ठ नेते शरद पवार कोणालाही भेटायला गेले नाहीत. मात्र संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यावर मात्र त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवले. मी खूप आधीपासून सांगत होतो की संजय राऊत हे शिवसनेचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत यावर हे शिक्कामोर्तबच आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये आणि महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शरद पवार हे फक्त चहा प्यायला नरेंद्र मोदींकडे जाणार नाहीत, एवढे मी खात्रीने सांगतो. पृथ्वीराज चव्हाण हे अधूनमधून पेपर वाचत असावेत. त्यामुळे ईडीच्या छाप्यातून काही निष्पन्न होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या सात्विक स्वभावामुळेच महाराष्ट्राचा काय विकास झाला याचे आपण साक्षीदार आहोत.
सोमय्यांची चूक असेल तर शासन होईल
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लोकवर्गणीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. यासंबंधी विचारले असता, किरीट सोमय्यांची चूक असेल तर शासन होईल असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
अंधारात कोणी काही पोस्टर लावणार असेल तर..
कोथरूडमध्ये मी सुरू केलेला फिरता दवाखाना, फिरते वाचनालय सुरू आहे. कोविड काळात मी खूप काम केले आहे. आता अंधारात कोणी काही पोस्टर लावणार असेल तर त्याला काय करणार असेही पाटील म्हणाले.
राऊतांचे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीय
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर पहिल्यांदाच राऊत दिल्लीहून मुंबईत येत आहे. त्यामुळे राऊतांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. यावरुन चंद्रकांत पाटलांनी राऊतांना टोला लगावला. संजय राऊत हे युक्रेनवरून आल्यासारखे झालेले स्वागत अनाकलनीय आहे असे ते म्हणाले.