संजय यांचा हात सैल तर सतेज यांच्याकडून इच्छापूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:41+5:302021-07-02T04:16:41+5:30
कोल्हापूर : संजय कसे विनम्र, तसा त्यांचा हातही सैलच, सतेज तर राज्यमंत्री असले तरी सर्वाची इच्छापूर्ती करण्यात त्यांचा हात ...
कोल्हापूर : संजय कसे विनम्र, तसा त्यांचा हातही सैलच, सतेज तर राज्यमंत्री असले तरी सर्वाची इच्छापूर्ती करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही अशा मिश्कील टिप्पण्यांनी डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा कौतुकात न्हाऊन निघाला. भावांची आदर्श जोडी ठरावी, अशी दोन कर्तृत्वान मुले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे येणारा नातू यामुळे डी.वाय.पाटील यांच्या भाग्याचाही हेवा वाटतो, अशा शब्दात दिलेल्या शुभेच्छांनी सोहळ्याला कौटुंबिक किनार लाभली.
निमित्त होते, उद्घाटन सोहळ्याचे मात्र या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ऑनलाइन का असेना पण एकत्र आलेल्या नेत्यांनी कार्यक्रमाचा नूरच पालटला. याची सुरुवातच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. ते म्हणाले, संजय आणि सतेज यांच्या रुपाने डी.वाय यांना कर्तबगार मुले मिळाली, त्यातही सतेज यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचे काम तेच करतात, हे दोघांनी डी.वाय ग्रुप उंचीवर नेऊन ठेवला, आता ऋतुराज ही तिसरी पिढी त्यात नवी भर घालेल. लहान असताना मर्सिडिज कारमध्ये पहिल्यांदा बसण्याचा मान डी.वाय यांच्यामुळेच मिळाल्याची आठवण सांगताना राजारामबापू व डी.वाय यांचे कौटुंबिक स्नेह सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संस्थाचालकांकडे नम्रपणा कसा असावा याचा आदर्शच संजय पाटील यांनी घालून दिल्याचे सांगितले. हाच सूर पुढे चालू ठेवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही संजय पाटील यांनी सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्याचे कौतुक करतानाच मी आणि सतेज एकत्रित राजकारण करत असताना पैशाचा प्रश्न आला की संजय पाटील यांच्याकडे धाव घेतो. तसे सतेज पाटील हात आखडतील पण संजय यांचे तसे नाही, ते हात न आखडता सहकार्य करतात. गोकूळ निवडणुकीत मतदार या तळसंदेच्या फार्मवरच ठेवले होते, तेव्हा त्यांचा पाहुणचार पाहिला असल्याची मिश्कील टिप्पणीही केली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही डी.वाय. दादा यांची पुढची पिढी कर्तबगार निघाली यासारखे दुसरे भाग्य नाही. भावांची आदर्श जोडी कशी असावी, परिवाराचे प्रेम कसे असते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचेही निरीक्षण नोंदवले.
चौकट
पाठीराखा संजय
सतेज पाटील राजकारणात एवढा वेळ कसे काय देतात याचे उत्तर संजय पाटील पाटील हे आहे, हे सांगताना जयंत पाटील यांनी राजकीय पुरुषांच्या मागे संजय यांच्यासारखा एक तरी भाऊ असावाच लागतो. सतेज यांना तो पाठीराखा मिळाला आहे, अशा शब्दात कौतुक केले.
चौकट
शरद पवार यांचीही आठवण
म्हशीचे दूध घरात येते, पण म्हैसच दारात येऊन दूध देते हे कोल्हापुरात आजोळी आल्यावर पहिल्यांदाच पाहिले. हे फक्त कोल्हापुरातच घडते अशी आठवण पवार यांनी सांगितली.