संजीव दयाळ यांची न्यायालयात साक्ष
By Admin | Published: November 21, 2014 11:56 PM2014-11-21T23:56:38+5:302014-11-21T23:56:38+5:30
कुलकर्णी लाच प्रकरण : राज्याच्या महासंचालकांच्या साक्षची दुसरी वेळ
कोल्हापूर : जातपडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोन दक्षता पथकाचे संशयित पोलीस निरीक्षक विजय गोविंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या लाच प्रकरणाच्या खटल्यातील सुनावणीसाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्यासमोर आज, शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात साक्षीदार म्हणून येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एका खटल्यात सूर्यकांत जोग हे पोलीस महासंचालक असताना साक्षीसाठी न्यायालयात हजर राहिले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरज (जि. सांगली) येथील श्रीमती फरिदा जहाँगीर जमादार यांनी दोन मुलांसाठी जातपडताळणी समिती कार्यालय क्रमांक दोनकडे अर्ज केला होता. यावेळी संशयित पोलीस निरीक्षक विजय गोविंद कुलकर्णी (रा. स्वामी समर्थ मठाजवळ, चिंचवड, पुणे) वरिष्ठांना अनुकुल अहवाल देण्यासाठी तीन आॅक्टोबर २०११ रोजी २० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत फरिदा जमादार यांनी कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर दोनवेळा लाचेची पडताळणी पोलिसांनी केली. त्यानंतर १० आॅक्टोबर २०११ ला सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच घेताना संशयित विजय कुलकर्णी यांना पोलिसांनी पकडले. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक एम. डी. शिंदे यांनी, विजय कुलकर्णी हे प्रथम श्रेणीचे अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी सर्व कागदपत्रे व न्यायालयात खटला चालविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी मंजूर केला.
त्यानंतर आज, शुक्रवारी टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात साक्ष देण्यासाठी सकाळी ११ वाजता संजीव दयाल एम. बी. तिडके यांच्या न्यायालयात आले होते. सुमारे तासभर साक्ष झाली. सरकारच्यावतीने साहाय्यक सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी सरतपास केला तर बचाव पक्षांच्या वकिलांनी उलट तपास केला. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.