संजीव पुनाळेकर यांना अटक करा
By admin | Published: February 8, 2016 01:03 AM2016-02-08T01:03:24+5:302016-02-08T01:11:48+5:30
पानसरे समता संघर्ष समिती : याप्रकरणी स्वत: लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
कोल्हापूर : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सनातन संस्थेच्या अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर खटला दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागशी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या विषयात आपण स्वत: लक्ष घालू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
रेसिडेन्सी क्लब येथे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मेघा पानसरे, चंद्रकांत यादव यांनी अॅड. पुनाळेकर हे जाहीरपणे समीर गायकवाडची बाजू घेत असून, त्याचे समर्थन केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
सनातन संस्थेचे साधक चार बॉम्बस्फोटांत सापडले आहेत. २००८ मध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सनातनचे रमेश गडकरी व विक्रम भावे यांना दहा वर्षांची शिक्षा झाली. २००९ मध्ये मडगाव बॉम्बस्फोटात सहा साधकांवर आरोप होऊन त्यांमधील रुद्र पाटील अद्याप फरार आहे. २०११मध्ये वाशी बॉम्बस्फोटात सनातनच्या साधकांना अटक झाली. २००८ मध्ये सनातनच्या हस्तकावर पनवेलच्या बॉम्बस्फोटाचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांना २०१५ मध्ये भेकडपणे गोळ्या घातल्या. या आरोपावरून ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याला अटक झाली आहे. सकृतदर्शनी पुरावे असल्यामुळे या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला आहे. समीर गायकवाडचे वकील पुनाळेकर साक्षीदारांना धमकावीत आहेत. त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पुनाळेकर आपल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू राष्ट्र करणार असल्याचे जाहीर करीत आहेत. धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू किंवा मुस्लिम राष्ट्र बनवू इच्छिणारे देशद्रोही आहेत. गोविंद पानसरे यांच्यावर वाटेल ते आरोप करून पुनाळेकर समाजभावना भडकवित आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उदय नारकर, अनिल चव्हाण, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, बाबूराव कदम, सुवर्णा तळेकर, सुभाष वाणी, दिलदार मुजावर, आदी उपस्थित होते.