व्याधीग्रस्त, गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांसाठी संजीवनी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:50+5:302021-05-17T04:23:50+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्यावतीने रविवारपासून दि. २३ मे पर्यंत व्याधीग्रस्त व गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांसाठी ...
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्यावतीने रविवारपासून दि. २३ मे पर्यंत व्याधीग्रस्त व गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांसाठी "संजीवनी अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियांनाची सुरुवात रविवारी राजेंद्रनगर व रमणमळा या भागातून सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली.
अभियानाअंतर्गत रविवारी रॅपिड ॲंटिजन ३२ व आरटीपीसीआर ६१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये पाच नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिकेच्यावतीने शहरामध्ये एकूण १४ हजार व्याधीग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत उर्वरित सर्व गंभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन गृह भेटीद्वारे तपासणी केली जाणार आहे. यासाठी ३०० शिक्षक तसेच आरोग्य कर्मचारी, केळमटी कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक नागरी आराेग्य केंद्रनिहाय संपर्क अधिकारी नेमून या मोहिमेचे संनियंत्रण केले जाणार आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. व्याधीग्रस्त व गंभीर आजारी असणाऱ्या व्यक्तींना या संसर्गाचा धोका अधिक असलेने अशा व्याधीग्रस्त व्यक्तींपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यांची चाचणी करून कोविड निदान झालेस लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. म्हणून संजीवनी अभियान राबिवले जात आहे.
कोविड-१९ बाबत घ्यावयाच्या दक्षतेसाठी व मार्गदर्शन करण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये व्याधीग्रस्त व्यक्तींना लक्षणे येण्यापूर्वी व कोविडचे संक्रमण होण्यापूर्वी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करता येईल. तसेच २४ ते ४८ तासात ॲडमिट होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
सर्व नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.