उमद्या 'संकेत'च्या अकाली जाण्याने संकेश्वर-हिटणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:23+5:302021-06-21T04:17:23+5:30
सीमाभागातील प्रसिद्ध युवा छायाचित्रकार व लघुपट निर्माता संकेत मल्लाप्पा मन्नाई (वय २५) याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने रविवारी (२०) सकाळी ...
सीमाभागातील प्रसिद्ध युवा छायाचित्रकार व लघुपट निर्माता संकेत मल्लाप्पा मन्नाई (वय २५) याचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने रविवारी (२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास निधन झाले. त्याच्या अकाली जाण्याने हिटणी-संकेश्वरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रविवारी (२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संकेश्वर येथील राहत्या घरी छातीत कळ येऊन तो खाली कोसळला अन् क्षणाधार्थ त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे कुटुंबियांसह त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी व आजोबा असा परिवार आहे.
हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार मल्लाप्पा मन्नाई (पेंटर) यांचा तो मुलगा होय. त्याने संगणकशास्त्राची पदविका घेतली होती. परंतु, वडिलांकडून मिळालेल्या फोटोग्राफी व व्हिडिओ शुटिंगच्या ज्ञानामुळे त्याने फोटोग्राफीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
हिटणीसह पंचक्रोशीतील सामाजिक कामातही तो हिरिरीने भाग घ्यायचा. काही काळ त्याने 'मनसे'मध्येही काम केले होते. 'इमॅजिका क्रिएशन'च्या माध्यमातून अनेक होतकरू तरुणांना त्याने रोजगाराची संधी मिळवून दिली. 'मधुमती' नावाचा लघुपटही त्याने तयार केला आहे.
चौकट
* आई-वडिलांना धक्का...
संकेत हा आई-वडिलांना एकुलता होता. गडहिंग्लजमधील अनेक वर्षे पेंटिंगच्या व्यवसायानंतर त्याच्या वडिलांनी संकेश्वर येथे फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याची धुरा संकेतकडेच होती. सध्या त्याच्या लग्नाचा बेतही सुरू होता. परंतु, नियतीने कर्तबगार मुलाला अकाली हिरावून नेल्यामुळे शून्यातून विश्व निर्माण केलेल्या त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
फोटो : संकेत मन्नाई : २००६२०२१-गड-१०