महावीर महाविद्यालयातील संकेत साबळे याला दुबईत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:51+5:302021-09-24T04:29:51+5:30
कोल्हापूर : महावीर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून बी. व्होक. विद्याशाखेतील प्रिंटिंग अँड पब्लिशिंग या विषयातील पदवीधर विद्यार्थी संकेत अप्पासाहेब ...
कोल्हापूर : महावीर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून बी. व्होक. विद्याशाखेतील प्रिंटिंग अँड पब्लिशिंग या विषयातील पदवीधर विद्यार्थी संकेत अप्पासाहेब साबळे याला दुबईतील कंपनीत ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली आहे. या कंपनीकडून त्याला निवडीचे पत्र मिळाले आहे. या निवडीबद्दल त्याचा श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. के. ए. कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संकेत याने नवनवीन ज्ञान आत्मसात करून स्वतःचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे. दुबईत काम करण्याबाबत मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे ॲड. कापसे यांनी आवाहन केले. महाविद्यालयात सन २०१८ पासून यूजीसीच्या अनुदानातून कौशल्याधिष्ठित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गोवा, मुंबई व परदेशात नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव मोहन गरगटे, बी. व्होक. विभागाच्या समन्वयक डॉ. सरला मेनन, डॉ. संदीप नलवडे, आदी उपस्थित होते.
फोटो (२३०९२०२१-कोल-संकेत साबळे (महावीर कॉलेज) : दुबईत नोकरीसाठी निवड झालेल्या महावीर महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत साबळे याचा सत्कार ॲड. के. ए. कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेजारी मोहन गरगटे, राजेंद्र लोखंडे, संदीप नलवडे, सरला मेनन, आदी उपस्थित होते.