इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात संस्कृत विषय
By admin | Published: February 11, 2016 09:31 PM2016-02-11T21:31:56+5:302016-02-11T23:41:44+5:30
केवळ तोंडी स्वरूपात समावेश : संस्कृत भाषेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा शासनाचा प्रयत्न
भरत शास्त्री -बाहुबली --संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असूनही या भाषेला शालेय अभ्यासक्रमांत म्हणावे तेवढे महत्त्व दिलेले नाही. सध्या राज्य शासनाच्या भाषा अभ्यासक्रमात इयत्ता आठवीपासून संस्कृत शिकविले जाते. तथापि, त्याही अगोदरच्या इयत्तांपासून संस्कृत शिकवावे, अशी मागणी संस्कृतप्रेमी व शिक्षक करीत आहेत. शासनाच्या संस्था एन.सी.ई.आर.टी., विद्यापरिषद व शिक्षण विभाग याबाबत सकारात्मक असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून केवळ तोंडी स्वरूपात इयत्ता सहावीपासून ही भाषा सुरू करण्यासाठी अंतिम आराखडा तयार करीत आहेत.
राज्यात सध्या त्रिभाषा सूत्रानुसार अभ्यासक्रमाची रचना आहे. त्यामध्ये आठवीपासूनच हिंदी विषयाला पर्याय म्हणून संस्कृत विषय अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचवेळी सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून संस्कृत हा विषय आहे. त्याला पालकांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे असतो. शिवाय अन्य राज्यांमध्ये देखील संस्कृत विषयाचे अध्यापन काही ठिकाणी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गापासून केले जाते; पण महाराष्ट्रात आठवीपासून संस्कृतचा श्रीगणेशा होतो. त्याऐवजी पाचवीपासून संस्कृत विषय असावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे.
२०१२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने सहावीपासून संस्कृत सुरू करण्यासाठी आराखडा व अभ्यासक्रम तयार करून घेतले; परंतु राजकीय दबावामुळे त्याला मूर्त रूप येऊ शकले नाही. आता चार वर्षांनंतर पुन्हा सहावीपासून तोंडी स्वरूपातच असेना, पण संस्कृत भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे.
सहावीपासून जरी संस्कृत विषय सुरू केला, तरी ज्यादाचे विषय शिक्षक दिले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये संस्कृत शिक्षक
आहेत, त्याठिकाणीच सध्या तरी
हा विषय सुरू करता येणार आहे. हे करीत असताना हिंदी विषय व शिक्षकांच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही, याबाबत शासन आग्रही आहे.
संस्कृत भाषेत अपूर्व ज्ञानाचे भांडार आहे. विज्ञान, गणित व भूगोल यांसारख्या क्षेत्रातील अनेक जुन्या संस्कृत ग्रंथांचे अध्ययन व संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांमध्ये संस्कृत भाषेची गोडी निर्माण होणे अपेक्षित आहे. सहावीपासून संस्कृत सुरू करणे हा त्याचाच एक भाग आहे.- प्राची साठे (विशेष कार्यकारी अधिकारी, शिक्षणमंत्री कार्यालय, मुंबई)
सहावीपासून संस्कृत विषय सुरू करण्यासाठी आवश्यक आराखडा व अभ्यासक्रम तयार आहे. शासनाकडून जसे आदेश प्राप्त होतील, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार आहोत. - अनुराधा ओक
(अभ्यासक्रम विकसन विभागप्रमुख,
एन.सी.ई.आर.टी., पुणे)