Kolhapur News: बाळूमामांची बकरी घुसतात उभ्या पिकात, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय तोंड दाबून बुक्क्यांचा मार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:45 PM2023-02-15T12:45:22+5:302023-02-15T13:04:53+5:30

कथित कहाण्या आणि गोष्टींमुळे शेतकऱ्यांना हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करता येईना

Sant Balumama Trust flock of sheep in crops, loss to farmers in kolhapur | Kolhapur News: बाळूमामांची बकरी घुसतात उभ्या पिकात, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय तोंड दाबून बुक्क्यांचा मार 

Kolhapur News: बाळूमामांची बकरी घुसतात उभ्या पिकात, शेतकऱ्यांना सोसावा लागतोय तोंड दाबून बुक्क्यांचा मार 

googlenewsNext

राशिवडे : संत बाळूमामा ट्रस्टच्या मेंढरांचे कळप उभ्या पिकांत घुसत आहेत. ‘मेंढरांचा कळप बाळूमामांचा हाय. आडवू नका न्हाईतर धोक्यात येशीला’ अशा भीतीने ऊस, मका, शाळू, वैरणीसाठीच्या या पिकांचा फडशा पडत आहे. अंधश्रद्धेपोटी शेतकरी उभी पिके खाणाऱ्या मेंढरांच्या कळपांना साधे हटकण्याचेही धाडस करताना दिसत नाही. त्यामुळे नुकतीच उगवण होत असलेली भुईमूग, मका पिके व पूर्व मशागती पूर्ण झालेले ऊस या कळपांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. 

कथित कहाण्या आणि गोष्टींमुळे शेतकऱ्यांना हताशपणे पाहण्याशिवाय काहीच करता येईनासे झाले असून या विरोधात दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संत बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारभाऱ्यांशी बोलतो आणि तळ उठवायला सांगतो, असे सांगत फोन बंद केला.

संत बाळूमामांबद्दल समाजात मोठी आस्था आहे. या आस्थेच्या आड ट्रस्टच्या मेंढरांचे कळप उभ्या पिकात घुसत आहेत. कळपांचे कारभारी व सेवेकरी दीड हजारावर मेंढरे घेऊन परिसरातून फिरत आहेत. तीन दिवसांपासून येथे तळ ठोकलेल्या कळपांनी शेतकऱ्यांची उभी पिके फस्त केली. जे शेतकरी या कळपांना आपल्या शेतात येण्यापासून रोखतात त्यांना ‘भविष्यात वाईट घटना ऐकायला मिळणार, मामांची बकरी हाईत, आडवू नका, वाईट घडंल’, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. 

मामांची मेंढरं शेतातून फिरल्यास दुप्पट उत्पन्न येते, असाही समज करून दिला जात आहे. दहा-पंधरा दिवसाची पीक फस्त झाल्यानंतर शेतात काहीच शिल्लक राहत नाही, मग दुप्पट मिळणार कुठून, हे सत्य असताना अंधश्रद्धेच्या भीतीपोटी शेतकरी सहन करत आहेत. विरोध केल्यास त्यांची सोशल मीडियावरून बदनामी केली जात आहे.

याबाबत ग्रामपंचायतीत मंगळवारी झालेल्या बैठकीत हे कळप ताबडतोब गावातून हलवायला सांगण्याबरोबर पूर्वपरगावानगीशिवाय पुन्हा गावात कळप आणायचे नाहीत असे एकमताने ठरले. उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पाटील, आप्पा डकरे, सर्जेराव गोंगाणे, अशोकराव पाटील, धोंडीराम ऊर्फ पोपट पाटील, श्रीशेल मगदूम, रमाकांत तोडकर, दिलीप शिंदे, भरत पाटील, राजेंद्र जाधव, शंकर पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बाळूमामांच्या कळपाविषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याविषयी ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधला मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात. अंधश्रद्धेतून पिकांचे नुकसान होऊ देऊ नये. - उत्तम पाटील, पोलिस पाटील, राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी)
 

Web Title: Sant Balumama Trust flock of sheep in crops, loss to farmers in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.