कर्नाटकातील प्लास्टर मूर्ती बंदीने कुंभारवाड्यात सन्नाटा
By admin | Published: June 20, 2017 01:04 AM2017-06-20T01:04:08+5:302017-06-20T01:04:08+5:30
उत्पादन ऐंशी टक्क्यांनी थांबले : बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, सानेगुरुजी वसाहतीतील मोजक्याच घरात लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कर्नाटकमधील प्लास्टरच्या गणेशमूर्तींवरील बंदीमुळे सुबक गणेशमूर्ती घडविणारे कोल्हापुरातील कुंभारवाडे गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असला तरी शांत आहेत. कोल्हापूरच्या गणेशमूर्तींसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या कर्नाटक आणि गोव्यातून मागणी थांबल्याने या व्यवसायातील ऐंशी टक्के उत्पादन थांबले आहे.
सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती घडविण्यात पेणनंतर कोल्हापूरचा नंबर लागतो. बापट कॅम्प, शाहुपूरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, सानेगुरुजी वसाहत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने तयार झालेल्या कच्च्या गणेशमूर्ती कर्नाटकपासून, पंजाब, हरियाणापर्यंत या राज्यांमध्ये पाठविल्या जातात. त्यामुळे उन्हाळ्यातच गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली जाते. दरवर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत कुंभार व्यावसायिकांकडून हजारो गणेशमूर्ती कर्नाटक, गोव्यात पाठविल्या जातात.
परराज्यांची आॅर्डर पूर्ण झाले की, कोल्हापुरातील भाविकांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची (पान ४ वर)
कर्जाचा ताण
गणेशोत्सव हा कुंभार समाजाचा वर्षातला सर्वांत मोठा व्यवसाय आहे. त्या आधारावर कुटुंबाच्या गरजा, घराचे बांधकाम अशी कामे केली जातात. मूर्ती बनविण्यासाठीही कर्ज उचलावे लागते. गणेशोत्सव संपला की मिळणाऱ्या एकदम उत्पन्नातून कर्जे भागविली जातात. या व्यवसायातून अनेक तरुणांनाही रोजगार मिळतो. यंदा मूर्तीची मागणीच न आल्याने बेरोजगारी आणि कर्जाचा ताण वाढला आहे.
मी दरवर्षी दीड ते दोन हजार गणेशमूर्ती कर्नाटकात पाठवित होतो. माझ्या ७० टक्के मूर्ती तेथेच जायच्या, गेल्यावर्षी त्यातील काही मूर्ती परत आल्या. यावर्षी तर मागणीच आलेली नाही. त्यामुळे फक्त कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा या ठराविक ठिकाणीच पाठविण्यासाठी चारशे ते पाचशे गणेशमूर्ती बनविल्या आहेत.
- रावसाहेब एकोंडीकर
(कुंभार व्यावसायिक)
कर्नाटक आणि गोवा ही कोल्हापूरच्या गणेशमूर्तींची सर्वांत मोठी बाजारपेठ होती. आता तेथेच प्लास्टर मूर्तींना बंदी घातल्याने कोल्हापूरच्या व्यवसायावर ऐंशी टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळे कर्ज आणि बेकारीचा धोका अधिक आहे.
- उदय कुंभार (कुंभार व्यावसायिक)