लाडक्या बाप्पासाठी संतोष मिरजेंनी दिली मोफत घरपोच रिक्षासेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:04 AM2018-09-14T01:04:38+5:302018-09-14T01:06:22+5:30
गणरायाचे भक्त व त्यांचा लाडका बाप्पा घरपोच आनंदात विराजमान व्हावा म्हणून रुईकर कॉलनी, प्रज्ञापुरी येथील रिक्षाचालक-मालक संतोष लक्ष्मण मिरजे यांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ७० गणेशभक्तांची गणेशमूर्ती आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा देत
कोल्हापूर : गणरायाचे भक्त व त्यांचा लाडका बाप्पा घरपोच आनंदात विराजमान व्हावा म्हणून रुईकर कॉलनी, प्रज्ञापुरी येथील रिक्षाचालक-मालक संतोष लक्ष्मण मिरजे यांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ७० गणेशभक्तांची गणेशमूर्ती आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा देत आपला भक्तीचा असा वाटा उचलला.
संतोष मिरजे हे गेली तीन वर्षे आपल्या रिक्षातून गणेशभक्तांना ही मोफत घरपोच सेवा देत आहे. यंदाच्या वर्षीही बापट कॅम्प, कुंभारगल्ली येथून रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत, प्रज्ञापुरी येथील गणेशभक्तांना ही सेवा दिली. केवळ गणपती व श्री स्वामी समर्थ यांच्यावरील श्रद्धेपोटी आपण ही सेवा देत असल्याचे तसेच वडील लक्ष्मण मिरजे यांच्याकडून मिळत असलेली प्रेरणा यातूनच मी हे कार्य करीत असून, यापुढेही सातत्याने ही मोफत सेवा देण्याचे व्रत कायम ठेवणार असल्याचे सतीश लक्ष्मण मिरजे यांनी सांगितले.
अशावेळी भाविकांचा आनंद, लहान मुलांची हौस पाहण्यासारखी असते. वडिलांसमान व्यक्तींचा आशीर्वादही या सेवेमुळे लाखमोलाचा मिळतो, यातच मी समाधानी असल्याचे सतीश शेवटी सांगायला विसरत नाही.