कोल्हापूर : आयडीबीआय गैरव्यवहार प्रकरणी आरळेतील संतोष पाटील याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:23 PM2018-10-27T17:23:38+5:302018-10-27T17:29:15+5:30
शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याला शुक्रवारी (दि. २६) अटक केली.
कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व ‘आठ अ’ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेला सुमारे आठ कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी फरार म्होरक्या संतोष बळवंत पाटील (वय ३०, रा. आरळे) याला शुक्रवारी (दि. २६) अटक केली.
न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पाटील याने शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे करून प्रत्येकी तीस हजार रुपये कमिशन घेत सुमारे दोन कोटी रुपये मिळविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे यांना हाताशी धरून पाटील याने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. शेतकऱ्यांकडून तो पॅनकार्ड आणि आधारकार्ड घेत होता. उर्वरित सर्व कागदपत्रे, कारखान्याला घातलेला उसाची बिले स्वत: तयार करून कागदपत्रावर शेतकऱ्यांची सही घेऊन तो बॅॅँकेत अर्ज दाखल करीत होता.
दोन ते अडीच लाखांचे कर्ज मंजूर झाले की, प्रत्येक शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपये कमिशन घेतले आहे. अशा सुमारे ६०० शेतकऱ्यांकडून त्याने दोन कोटी रुपये कमिशन घेतले आहे. तत्कालीन व्यवस्थापक गंधे यांनीही कमिशन घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी पाटील याला बुलेट घेऊन दिली होती. ती पोलिसांनी तपासाकामी जप्त केली आहे.
पाटील याने शेतकऱ्यांना विमा पॉलिसीची सक्ती करून त्याने प्रत्येकी ३१ हजार रुपये भरून घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या हाती दीड लाख रुपयेच पडले. उर्वरित रक्कम कमिशनमध्ये गेली आहे. आता मात्र बँकेत भरताना व्याजासह अडीच लाख रुपये भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे अधिक तपास करीत आहेत.
टेम्पोचालक बनला करोडपती
पाटील हा दोन वर्षांपूर्वी टेम्पोचालक म्हणून काम करीत होता. बँक कर्जप्रकरणामध्ये त्याला भरमसाट पैसे मिळू लागल्याने त्याचे राहणीमान सुधारले. त्याने गावात दूधसंस्था काढली. बंगला बांधला. स्वत:च्या नावे युवा मंच काढून तरुणांची फळी निर्माण केली.
दूधसंस्था काढतानाही त्याने बोगस कागदपत्रे जोडल्याची गावात चर्चा आहे. त्याला करोडपती बनविण्यामध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक गंधे यांचा हातभार असल्याचेही प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे गंधेदेखील आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. वरणगे येथील शाखेनंतर त्याची क्रशर चौक येथील आयडीबीआय बँकेत बदली झाली होती. त्या ठिकाणीही त्याने संतोष पाटील याला हाताशी धरून ५० लाखांच्या वरती बोगस कर्जप्रकरणे केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.