शिरोळमध्ये २० हजार कुटुंबांना सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:08+5:302021-08-13T04:27:08+5:30
संदीप बावचे शिरोळ : पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व स्थलांतरित झालेल्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळणार आहे. सानुग्रह अनुदान निकषात ...
संदीप बावचे
शिरोळ : पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या व स्थलांतरित झालेल्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळणार आहे. सानुग्रह अनुदान निकषात बदल केल्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांतून राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
जवळपास ४३ गावांतील २० हजार कुटुंबांनी पुरामुळे स्थलांतर केले होते. स्थलांतर केलेल्या कुटुंबांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची यादी तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू केले आहे.
शिरोळ तालुक्यात महापुरामुळे ४३ गावांना फटका बसला होता. जवळपास २० हजार कुटुंबांतील ८३ हजारांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनाने ४८ तासापेक्षा अधिक काळ घर पाण्यात बुडालेले आहे, अशा कुटुंबांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ज्यांच्या घरात महापुराचे पाणी आले होते, अशा परिवाराला सानुग्रह अनुदान देण्यासाठी पंचनामे सुरू केले. मात्र, प्रशासनाच्या आवाहनानंतर मिळेल त्या वाहनाने अनेक नागरिकांनी स्थलांतर केले होते. अशा पूरग्रस्तांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याने पूरग्रस्तांबरोबरच सामाजिक संघटनांनी अनुदानाची मागणी केली होती.
दरम्यान, बुधवारी राज्य शासनाने सानुग्रह अनुदान वाटपाच्या निकषात बदल केला आहे. पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतर केलेल्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ‘लोकमत’नेही ‘त्या कुटुंबांना सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
कोट :
४ ऑगस्टला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन शिरोळ तालुक्यासह पूरबाधित जिल्ह्यामधील एकूण नुकसानीची माहिती दिली होती. महापुराने वेढलेल्या अशा सर्व गावांना आणि त्या गावांतील प्रत्येक परिवाराला सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा, अशी आग्रही मागणी केली होती. निकषात बदल केल्यामुळेच पूरग्रस्तांना अनुदान मिळणार आहे.
- आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर
फोटो - १२०८२०२१-जेएवाय-०१-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ०२-लोकमतचे वृत्त